गजानन चोपडे
अमरावती : सत्ता स्थापनेच्यावेळी महाविकास आघाडीसोबत असलेले विदर्भातील अपक्ष आमदार काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक चार अपक्ष आमदार असलेल्या अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार आपल्या निर्णयावर ठाम असले तरी दोन आमदारांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतली आहे. हे सर्व आमदार रिचेबल आहेत, हे विशेष. सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेनेने ज्या दोन आमदारांना तातडीने मुंबईला आणण्यासाठी चार्टर्ड प्लेन पाठविले होते त्यापैकी एक आमदार नरेंद्र भोंडेकर हे सुरतला एकनाथ शिंदे यांच्या तंबूत पोहोचले.
भंडारा येथील शिवसेना समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुरतला पोहोचल्याची माहिती खुद्द भोंडेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ते म्हणाले, अडीच वर्षे माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांनी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे आपण शिंदे यांच्यासोबत आहोत. अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा हे भाजप समर्थक असल्याचे सर्वश्रुत आहे. हनुमान चालिसावरून सबंध राज्यात रान पेटले असताना राणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरुद्ध टीकेची झोड उठवत होते. शिवाय राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही ते भाजपच्याच बाजूने होते. त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट आहे. तिकडे मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सत्ता असो अथवा नसो, आपण सदैव अजित पवार यांच्यासोबत आहोत. मात्र, राज्यसभा निवडणुकीनंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांबाबत जे वक्तव्य केले होते, त्यावर त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपण बायरोड मुंबईला जात आहोत. आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जो आपला निर्णय असेल तोच आपले सहकारी आमदार राजकुमार पटेलांचाही असल्याचे बच्चू कडू म्हणाले. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल हे सुरुवातीपासूनच भाजपसोबत आहेत.
चर्चा राणा-पटेल यांच्या चहाची
मुंबईत हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुरू असताना सोशल मीडियाच्या एका ग्रुपवर आमदार रवी राणा आणि राजकुमार पटेल यांचा चहा घेतानाचा फोटो व्हायरल केल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. मात्र, तो फोटो जुना असल्याची पुष्टी पटेल यांच्या स्वीय सहायकांकडून करण्यात आली.