अमरावती: भारतीय संविधानाचा सर्वाधिक अपमान करण्याचे काम काॅंग्रेसने सत्तेत असताना केले आहे, परंतु तेच आता स्वत:ला संविधान रक्षक सांगत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, भारतीय संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि आत्मा कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे विरोधकांच्या दृष्ट प्रचाराला जनता बळी पडणार नाही, असे मत भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केले.
उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्याकडे भाजपच्या वतीने महाराष्ट्र निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिली आहे. त्याअनुषंगाने ते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत असून, उमेदवरांच्या, तसेच पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकी घेत आहेत. सोमवारी ते अमरावतीमध्ये असताना, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले संविधानाचा सर्वाधिक अपमान करण्याचे काम काॅंग्रेसने केले आहे, मग ते मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना पारीत करण्यात आलेला राहुल गांधी यांनी फाडलेला अध्यादेश असो किंवा इंदिरा गांधी यांनी लावलेली देशात आणीबाणी असो, हे संविधान विरोधी कृत होते, परंतु काॅंग्रेस पक्ष सध्या भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर संविधान बदलवेल, असा दृष्ट प्रचार महाविकास आघाडीतील पक्ष करत आहेत. महाविकास आघाडी हे विकास आणि सनातन दोघांच्याही विरोधी आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दोन जागा निवडून आणण्यासाठीदेखील मोठा संघर्ष करावा लागेल. हनुमान चालिसा वाचल्याने खासदार, आमदाराला जेलमध्ये टाकण्याचे काम महाविकास आघाडी सरकारमध्ये झाले आहे. देशातील संविधान कोणीही बदलू शकत नाही, त्यामुळे जनता महाविकास आघाडीच्या दृष्ट प्रचाराला बळी पडणार नाही, असे दिनेश शर्मा म्हणाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिघाडे आदी उपस्थित होते.