अमरावती: आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दांमुळे महिलांचा अवमान झाला, अशी तक्रार महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी २८ ऑक्टोबर रोजी राजापेठ पोलिसांत नोंदविली आहे. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी आमदार बच्चू कडू यांच्याविरुध्द भादंविचे कलम ५०१ अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदविला.
आमदार राणा व आमदार कडू यांच्यातील शाब्दिक वाद आता चांगलाच वाढला आहे. आमदार बच्चू कडू यांनी खोके घेतले, असा खळबळजनक आरोप आमदार राणा यांनी केला. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी आमदार राणा यांना १ नोव्हेंबरपर्यंत केलेल्या आरोपाबाबत पुरावे घेवून यावे, असे आव्हान दिले आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी आमदार राणा यांच्यावर टीका करताना काही शब्द वापरले आहे, त्या शब्दांमुळे महिलांचा अपमान झाला आहे. असा आरोप करुन महिला मुक्ती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी राजापेठ पोलिस ठाण्यात आमदार बच्चू कडू यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली.
तत्पुर्वी याच प्रकरणात आमदार रवि राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे आपली बदनामी झाली, अशी तक्रार आमदार कडू यांनी केली होती. या तक्रारीवरुन २३ ऑक्टोंबरला आमदार रवि राणा यांच्याविरुध्द देखील राजापेठ पोलिस ठाण्यातच अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.