राज्यमंत्री बच्चू कडू यांची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी
मुंबई : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे औद्योगिक क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. तोंडगाव येथील औद्योगिक क्षेत्रातही आवश्यक सुविधांअभावी परिसराचा विकास रखडलेला आहे. त्याला गती देण्यासाठी या दोन्ही ठिकाणी आवश्यक सुविधा उभारून विकास करावा, अशी मागणी जलसंपदा, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली.
चांदूर बाजार हे तालुक्याचे शहर आहे. या शहरापासून २५ किलोमीटरवर तोंडगाव औद्योगिक क्षेत्र आहे. तथापि, येथील एमआयडीसीत पुरेश्या सुविधा नाहीत. चांदूर बाजार तालुका व परिसराचा विकास करण्यासाठी चांदूरला औद्योगिक क्षेत्र विकसित करणे गरजेचे झाले आहे. चांदूर बाजार हे शहर नरखेड रेल्वे मार्गावर आहे. त्यामुळे तिथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यास मोठा वाव आहे. त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन याबाबत निर्णय व्हावा, अशी विनंती राज्यमंत्री कडू यांनी उद्योगमंत्र्यांकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तोंडगाव येथील औद्योगिक क्षेत्रातही आवश्यक सुविधा उभारण्यात याव्यात, अशीही विनंती निवेदनाद्वारे केली आहे.