फोटो - तूर १३ पी
परतवाडा : खावटी अनुदान योजनेअंतर्गत अचलपूर तालुक्यातील आदिवासींना शासनाकडून वितरित केले जात असलेले अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू निकृष्ट दर्जाच्या निघाल्या आहेत. तूर डाळ खाण्यायोग्य नाही. साखर अत्यंत बारीक आहे. तिखटाचा दर्जाही घसरला आहे.
खावटी अनुदान योजनेअंतर्गत आदिवासी विभागाकडून पात्र लाभार्थींना दोन हजार रुपयाचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते व उर्वरित दोन हजार रुपयांचे अन्नधान्य, कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची किट आदिवासींना दिली जाते. अचलपूर तालुक्यातील आदिवासींना हे वितरण सुरू आहे. या किटमध्ये मटकी एक किलो, चवळी दोन किलो, हरभरा तीन किलो, पांढरा वाटाणा एक किलो, उडीद डाळ एक किलो, तूर डाळ दोन किलो, मीठ तीन किलो, गरम मसाला ५०० ग्रॅम, शेंगदाणा तेल एक लिटर, मिरची पावडर एक किलो, चहा पावडर ५०० ग्रॅम आणि साखर तीन किलो, एक लिटर तेल असे १८ किलोग्राम धान्य आहे.
गौरखेडा कुंभी येथील आश्रमशाळेतून ही किट तीन दिवसांपासून अचलपूर तालुक्यातील आदिवासींना वितरित केली जात आहे. यात शेकडो आदिवासींनी या किटची उचल केली आहे. पण, या किटमधून देण्यात आलेली तूर डाळ व अन्य साहित्य खाण्यायोग्य नसल्याचे लाभार्थींचे म्हणणे आहे. या अनुषंगाने आदिवासी कार्यकर्ते व नेतेमंडळी जिल्हाधिकाऱ्यांसह आदिवासी आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहेत. याकरिता ते सोबत हे धान्यही घेऊन जाणार आहेत.
-----------
खावटी अनुदान योजनेंतर्गत दोन हजार रुपयांचे जे धान्य व किराणा वितरित केले जात आहे, त्याचा दर्जा निकृष्ट आहे. तुरीची डाळ खाण्यायोग्य नाही. किटमधील साहित्याची किंमत बाजारभावाप्रमाणे १००० ते १२०० रुपये एवढीच आहे. या अनुषंगाने २ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यासह तक्रार देणार आहे.
- तुळशीरामजी धुर्वे, लाभार्थी, परतवाडा
कोट:--
खावटी अनुदान योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या वस्तू निकृष्ट दर्जाच्या आहेत. यादीनुसार काही वस्तू कमी आहेत. ही आदिवासींची फसवणूक आहे. या किटसह जिल्हाधिकाऱ्यांकडे व शासनाकडे तक्रार देणार आहे.
सुखदेव पवार, जिल्हा परिषद सदस्य.
दिनांक:-13/09/21 फोटो