अखाद्य धान्याचा पुरवठा; नागरिकांचा आरोप, रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा
चांदूर बाजार : रेशन पुरवठा योजनेंतर्गत धान्याचा पुरवठा वाटपासाठी शासनातर्फे रेशन दुकानदारांना पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडून निकृष्ट धान्य पुरवण्यात येत आहे. हे निकृष्ट धान्य पुरविण्याचा उद्देश काय, अखाद्य दर्जाचे धान्य पुरवून शासन गरिबांच्या जिवावर उठले आहे का, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असल्याची ओरड नागरिकांतर्फे केली जात आहे. दुसरीकडे रेशन साहित्य मोफत बदलून घेण्याची दुकानदारांना सुविधा असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
कोणताही गरीब व्यक्ती,उपाशी राहणार नाही, याची काळजी घेत सरकारकडून अत्यल्प दरात धान्य तालुक्यातील परवानाधारक दुकानदारांमार्फत प्रत्येक गावातील गरजू लाभार्थींपर्यंत पोहचविले जाते.यासाठी शासनाकडून रेशन दुकानदारांच्या दुकानापर्यंत धान्य विनाखर्चाने पोहचविण्यात येते. या धान्यात प्रत्येक महिन्यात काही प्रमाणात, सडलेल्या अवस्थेतील अतिशय निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवण्यात येत आहे. नागरिकांना हे अखाद्य धान्य नाइलाजाने खावे लागत आहे.
ऑगस्ट महिण्यात मोफत धान्य योजनेंतर्गत तालुक्यात १४१ रेशन दुकानदारांना ९ हजार १४३ क्विंटल गव्हाचा साठा पुरविण्यात आला होता. या धान्यात काही प्रमाणात अतिशय निकृष्ट गहू आहे. मोफत असले तरी लाभार्थी त्याला स्पष्ट नकार देत आहेत. रेशन दुकानदारांच्या म्हनण्यानुसार, दरमहा एकूण धान्यांच्या चार ते पाच टक्के निकृष्ट धान्याचा पुरवठा होत आहे. हे निकृष्ट धान्य सर्वच रेशन दुकानदारांना पोहोचते असे नाही. काहींना एखाद दोन कट्टे जातात, तर काहींना काहीच नाही. हे निकृष्ट धान्य सर्वच राशन दुकानदारांपर्यंत जात नसल्यामुळे त्याचा फारसा बोभाटा होत नाही. ज्याच्या नशिबी निकृष्ट धान्य पोहोचते, त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो, हे वास्तव आहे.
--------------
निकृष्ट धान्य शासन रेशन दुकानदारांकडून स्वत: परत घेते. याचा कोणताही भुर्दंड रेशन दुकानदारांवर लावला जात नाही. याबाबत स्पष्ट सूचना आमच्या कार्यालयाकडून रेशन दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. जर कोणत्याही रेशन दुकानदाराकडे निकृष्ट दर्जाचे धान्य असेल, तर त्यांनी याबाबत पुरवठा विभागाला माहीती द्यावी. तालुका पूरवठा विभागाकडून तेवढेच धान्य त्यांना बदलून देण्यात येईल.
- राहुल केदारे, तालुका पुरवठा निरीक्षक, चांदूर बाजार.