अमरावती : राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीतील 'राजगोंड' या जमातीच्या नामसदृष्याचा गैरफायदा बिगर आदिवासींकडून घेत असल्याचे उघडकीस आले आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट यांनी ४ जुलै २०२३ रोजी इतर मागास प्रवर्गातील 'तेलंग' जातीचे असलेले परंतु 'राजगोंड' या अनुसूचित जमातीचे जातप्रमाणपत्र मिळविणारे एकाच कुटुंबातील वडील, मुलगा व मुलगी अशा तीन जणांचे जातप्रमाणपत्र रद्द करुन जप्त केले आहे.
प्राची नेताजी चौधरी हिने 'राजगोंड' जमातीचे जातप्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी अहमदपूर जि.लातूर यांचे कार्यालयाकडून मिळविले असून त्याचा क्र.नं.२०१५/एमआयएससी/डब्ल्यूएस-६७८,दि.२७/१/२०१५ असा आहे. पियूष नेताजी चौधरी याने 'राजगोंड' जमातीचे जातप्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी लातूर यांचे कार्यालयाकडून मिळविले असून त्याचा क्र.नं.२०१५/एमआयएससी/ डब्ल्यूएस- ६७७, दि.२७/१/२०१५ असा आहे. तर नेताजी माणिकराव चौधरी यांनी 'राजगोंड' जमातीचे जातप्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी लातूर यांचे कार्यालयाकडून मिळविले असून त्याचा क्र.नं.१९८३/सूंकिर्ण/कवि/२०३९ दि.२९/१२/१९८३ असा आहेत.
हे तिघेही जण व कुटुंबीय लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील होनाळी गावातील वंशपरंपरागत रहिवासी आहेत.या तिघांनीहीआपला 'राजगोंड' जमातीचा दावा तपासणीसाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट यांचेकडे सादर केला होता. तिघेही जण एकाच कुटुंबातील सदस्य असल्यामुळे त्यांचा दावा एकत्रितपणे पडताळणीचा निर्णय समितीने घेतला होता. राज्यात 'गौंड तेलंग' नावाची जात इतरमागास प्रवर्गात अस्तित्वात असून समाज व्यवस्थेनुसार या जातीचा पिढीजात व्यवसाय सिंधी अथवा ताडीपासून निरा तयार करुन विक्री करणे, औषधी विकणे असा होता. प्रांतातील बदलानुसार त्यांना कलाल, गौडा, गोंडला, तेलंग, गौड तेलंग असे सुद्धा संबोधले जाते.
देशात आदिवासी जमातीमध्ये गोंड, राजगोंड ही प्रमुख जमात आहे. या जमातीची बोलीभाषा, पेहराव, सण -समारंभ, दैवत, संस्कृती,भूप्रदेश वेगळा आहे. यात नामसदृष्याच्या नावाखाली घुसखोरी केली जात आहे. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येईल.- डॉ. संदीप धुर्वे आमदार, तथा राज्याध्यक्ष, अ.भा.गोंड आदिवासी संघ,महाराष्ट्र.