मांसाहारीपेक्षा शाकाहारी महागले
वरुड : पेट्रोल, डिझेलच्या किमतीने वाहनचालकांचे कंबरडे मोडल्याने जीवनाश्यक वस्तूचे भावसुद्धा वाढले आहे. तेल, डाळीचे भाव गगनाला टेकले आहे. गोरगरिबांना एका दिवसाच्या मजुरीत घ्यावे लागते केवळ एक किलो तेल, तर डाळीचे भावसुद्धा काडाडल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जेवणावळीमध्ये मांसाहारीपेक्षा शाकाहारी डिश महागल्या आहे. अंड्यापेक्षा दाल फ्राय महागली आहे. पालेभाज्या, तेल, साखर, डाळ अन्नधान्य महागल्याने गोरगरीब जनता कासावीस झाली असून एक वेळच्या जेवणावरच उदरनिर्वाह करावा लागत आहे.
देशात पेट्रोल, डिझेलच्या किमतीने शंभरी गाठल्याने याचा परिणाम वाहतूकदारावर झाला. वाहतुकीचे दर वाढले. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महागल्याने किराणा दुकानदार, व्यापाऱ्यांनी अन्नधान्याच्या किमतीत मोठी वाढ केली. लॉकडाऊनमध्ये हाताला काम नाही तर शेतीपयोगी मशागतीच्या कामाला सुरुवात झाली असून महिलांना १०० ते २०० रुपये तर पुरुषांना २०० ते ३०० रुपये रोज मिळतो. तर तेलाच्या किमतीमध्ये सोयाबीन तेल १५५ रुपये प्रति लीटर तर फल्ली तेल १८५ रुपयांपर्यंत पोहोचले. तुरीची डाळ ११० रुपये किलो, मिरचीपासून तर मसाल्याच्या पदार्थापर्यंत सर्वच जीवनाश्यक वस्तूंचे दर वाढले. पाले भाज्यासुद्धा कडाडल्या आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगावे की मारावे, हा प्रश्न निर्माण झाला. जेवणावळी, हॉटेल, धाब्यावर मांसाहारीपेक्षा शाकाहारी जेवण महागले असून अंडाकरीला ८० रुपये तर दाल फ्रायला १२० ते १३० रुपये मोजावे लागते. कोरोना कोविडमध्ये माहागाईनेसुद्धा कळस गाठल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे हाताला काम नाही तर दुसरीकडे महागाई गगनाला टेकली आहे.