‘अच्छे दिन’चे भंगले स्वप्न : सामान्यांना जीवन जगणे कठीण
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : ७८ वर्षांपूर्वी सोने ४० रुपये, तर चांदी २ रुपये तोळा होती. एका दिवसाची मजुरी मजुराला चार आणे मिळत असत़ आता मात्र महागाईने कळस गाठून सर्वच बाबींचे दर गगनाला भिडविले आहेत. सर्वसामान्य कुटुंबांना जीवन जगने कठीण झाले आहे़ ४४ वर्षांत महागाई दोनशे पटीने वाढली आहे़
पूर्वीच्या काळात पै, सापिका पैस, चवली, पावली या चलनाचा दैनंदिन आर्थिक व्यवहारात वापर होत असत़ आता पूर्णत: बदल झाला आहे़ १९६० पूर्वी असलेली वजनाची पद्धत सर्वच विसरले आहे़त. तीन माप म्हणजे एक पायली व सोळा पायली म्हणजे अंदाजे शंभर किलो़ पाच लिटर म्हणजे एक गॅलन. गॅलनचा वापर पेट्रोल व रॉकेलसाठी होत होता़ लाकडासाठी ४० किलोचा मण म्हणून व्यवहारात वापर होत असे कोळशासाठी घडा पद्धत होती़ कापड व सोन्याकरिता तोळा असे माप होते़ सध्या सोन्याचे व लाकडाचे मापन तेच आहे़ पण, सोन्याचा तोळ्याचा दर व लाकडाचा मणाचा दर दिवसेंदिवस वाढत आहे़ रॉकेलचा गॅलन हा शब्द कालबाह्य झाला आहे़
सन १९३४ ते १९४४ या काळात जीवनावश्यक वस्तूचा दर मांडला, तर पेट्रोल एक रूपयास एक गॅलन म्हणजे २० पैसे लिटर होते़ रॉकेल एक रुपयास चार गॅलन तर पाच पैसे लिटर असा दर होता़ सोने ४० रुपये व चांदी दोन रुपये तोळा होता़ वीज व पाण्याचे वार्षिक बिल ३ रुपये होते़ आज महागाईने किती उच्चांक गाठला आहे, हे या स्वस्ताईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे़ पूर्वी गवंडी, सुतार यांना एक दिवसाची मजुरी चार आणे होती. ७५ वर्षांपूर्वी गहू १ रुपयात ३ पायली व मोठा कोंबडा सव्वा रुपयात तसेच कोंबडी आठ आण्यात मिळत होती़ एक रुपयात चार शेर मटणाचा दर होता़ सध्या पाच रूपयाला मिळणारा हाफ कट चहा पूर्वी एक पैशात मिळत असे. त्या काळात आठ नग भजी एक आण्यात, मिसळ एक आण्यात, तर सर्व मिठाई एक रुपयात मिळत होती.
असा आहे शहरी भागातील खर्च
आज एका कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती व खर्चाची सांगड बसता बसत नाही. घरभाडे तीन हजार रुपये, धान्य सात हजार रुपये, दूध दररोज १ लिटर प्रमाणे १ हजार ५० रुपये, मुलांचा शिक्षणासाठी कोरोनाकाळातही येणारा किरकोळ खर्च ५०० रुपये, दवाखाना ८०० रुपये, तर गॅसची सबसिडी वगळता ८०० रुपये लागतात. पेट्रोल व मोबाईलवर होणारा खर्च वेगळाच. त्यामुळे आज एक रूपया शिल्लक राहत नाही़
ग्रामीण भागातील स्थिती वेगळीच
ग्रामीण भागात प्रतिदिन शंभर रुपये मजुरी असणाऱ्या पतीपत्नीला केवळ महिन्यातून २५ दिवस मजुरी असते़ महिनाकाठी त्यातून कसेबसे चार हजार रुपये पदरात पडतात. मुलाबाळासाठी वर्षातून एकदाच कपडे घ्यावे लागतात. दवाखान्याकरिता लागणारा खर्च हा उसनवारी घेवून करावा लागत आहे़ पै-पाहुणे येणे म्हणजे उसनवारी तिपटीवर जाते.
स्वस्ताईच्या काळातील दर
डाळ - १ रुपयात ४ शेर
कांदे - १ रुपयात १६ शेर
कडधान्य - १ रुपयात ५ शेर
गोडे तेल - १ रुपयात १ शेर
सुती कापड -२ रुपयात १ वार
खोबरे तेल - १ रुपयात १ शेर
ज्वारी - १ रुपयात ८ पायली
साखर - १ रुपयात ४ शेर
दूध - १ रुपयात १६ माप
तांदूळ - १ रुपयात ४ पायली
लसूण - १ रुपयात १० शेर
बटाटा - १ रुपयात ८ शेर
चहा- २रूपयात १ शेर
पितळ - २ रुपयात १ शेर
लोखंड - ४ आणे ते ८ आणे शेर
तांबे - ३ रुपयात १ शेर
महागाईचा वाढता उच्चांक
वस्तू -सन २००४ - सन २०२१
गहू (किलो) - ९ रुपये - ३० रुपये
तांदूळ (किलो) - १० रुपये - ४८ रुपये
साखर (किलो) - १४ रुपये - ३७ रुपये
चहा (किलो) - ८० रुपये - ३४० रुपये
खाद्यतेल (किलो) - ४० रुपये - १४५ रुपये
तूर डाळ (किलो) - ३० रुपये - १०६ रुपये
गॅस - २४४ रुपये - ८४० रुपये
डिझेल (लिटर) - २२ रुपये - ९० रुपये
पेट्रोल (लिटर) - ३ रुपये - ९७ रुपये
कोट