अमरावती/ संदीप मानकर
दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून संकलित झालेले दूध नोंदणीकृत दूध उत्पादित संघामार्फत शासकीय दूध योजनेला पुरवठा करतात. हिवाळ्यात चार हजार लिटरपर्यंत गेलेला पुरवठा पावसाळ्यात १२०० ते १५०० लिटरवर आला असून, यामध्ये तब्बल अडीच हजार लिटरने घट झाली आहे.
मात्र, कोरोनाकाळात नागरिकांकडून दुधाची मागणी वाढल्याने असंघटित दुग्ध व्यावसायिकांकडून नागरिकांना दुधाचा पुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये हॉटेल, चहाची कँटीन व दुधापासून इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करणे बंद होते. त्याकारणाने शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला खासगीत उचल नसल्याने त्यांनी शासकीय दूध योजनेकडे धाव घेतली होती. मात्र, आता बाहेर हॉटेल, चहा कँटीनवर दुधाची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत उन्हाळा व पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या दुधाची आवक घटते, हा पुष्ट काळ असून, यामध्ये दरवर्षीच दुधाच्या आवकमध्ये घट होत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, शासकीय योजनेकडे ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी आहे अशा असंघटित दूध उत्पादकांकडून खासगी डेअरी, हॉटेल, चहा कँटीनला दुधाचा पुरवठा होतो, तसेच विविध कंपन्यांच्या पाकीटबंद हजारो लिटर दुधाचा पुरवठासुद्धा करण्यात येतो. सध्या शेतकऱ्यांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ (सॉलिड नोट फॅट) करिता २५ रुपये प्रति लिटरचे दर शासकीय दूध विकास योजनेतून दिले जात आहेत.
बॉक्स :
दुधाची भुकटी भंडारा जिल्ह्यात
शासकीय दूध योजनेत संघाकडून दुधाचा पुरवठा होतो. येथे शेतकऱ्यांकडून घेतलेल्या दुधावर प्रक्रिया करून त्याचे रूपांतर पाकीटबंद दुधात करून आरए या ब्रँडने त्याची ३८ रुपये लिटरने मार्केटमध्ये विक्री केली जाते, तसेच जिल्ह्यातील दुधाची मागणी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित हजारो लिटर अतिरिक्त दूध हे भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघ यांच्याकडून भुकटीत रूपांतर करण्यासाठी पाठविण्यात येते.
बॉक्स :
या मोसमात वाढते आवक
मार्चपासून ते ऑगस्टपर्यंत नैसर्गिकरीत्या दुधाच्या आवकमध्ये घट होत असून, या काळात १२०० ते १५०० लिटरची आवक शेतकऱ्यांकडून होते. मात्र, ऑक्टोबर ते फेब्रुवारीदरम्यान साडेतीन ते चार हजार लिटर दुधाची आवक होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
या दिवसांत नैसर्गिकरीत्या दुधाच्या आवकमध्ये घट होते. आता अडीच हजार लिटर आवक घटली आहे. मात्र, ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात चार हजार लिटरची आवक होते. आता मागणी जरी वाढली असली तरी असंघटित दूध उत्पादित व्यावसायिकांकडून ती पूर्ण होते.
जी. पी. सोनोने, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, अमरावती