अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक अपहाराची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव हे मुंबई रवाना झाले. सक्तवसुली संचालनालायाच्या मुंबईस्थित कार्यालयात ते मंगळवारी सकाळी ११ वाजता स्वत: उपस्थित राहून बँकेच्या लेखापरीक्षण अहवालासह संपूर्ण दस्तावेज ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत.
जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यात ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली देण्यात आली. बँक आणि कंपनीत थेट व्यवहार असताना ती दलाली द्यायला नको होती. सबब, बॅंकेची आर्थिक फसवणूक झाली, अशी तक्रार बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी शहर कोतवालीत केली होती. याप्रकरणी १५ जून रोजी बॅकेच्या पाच आजी माजी कर्मचारी अधिकाऱ्यांसह ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. त्याअनुषंगाने ईडीने पत्र पाठवून यासंबंधीची संपूर्ण माहिती जिल्हा उपनिबंधकांना मागितली होती.
कोट
जिल्हा बँकेसंदर्भात मागितलेली माहिती मंगळवारी मुंबईस्थित ईडी कार्यालयात स्वत: उपस्थित राहून देणार आहोत.
- संदीप जाधव, जिल्हा उपनिबंधक