लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची पूर्वतयारी सुरू केली आहे. यंदा बदल्यांच्या धोरणात काही बदल करण्यात आले आहेत. अवघड क्षेत्रातील शाळांचे निकष बदलण्यात आले आहेत. बदल्या पाच टप्प्यात होतील. करोनाने भयावह स्वरूप धारण केले असतानाच बदली प्रक्रिया घडत आहे. मात्र, यासाठी ठरवून दिलेला हरकतींचा कालावधी पाहता ३१ मे पूर्वी बदल्या होणार का, की त्याला मुदतवाढ मिळणार याबद्दल शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा मात्र बदल्या होण्यासाठी शिक्षक संघटना आग्रही होत्या. शासनाने एप्रिलमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांच्या निकषात बदल करणारा आदेश जारी केला. शिक्षण विभागाने बदल्यांची पूर्वतयारी सुरू केली आहे. अवघड क्षेत्रातील शाळा निश्चितीसाठी सीईओंच्या अध्यक्षतेत बैठक झाली. यापूर्वी अवघड क्षेत्रातील शाळांची निवड अधिकारी प्रत्यक्ष शाळेच्या जागेची पाहणी करत होते. परंतु आता त्यासाठी निकष ठरवले आहेत. पेसा, डोंगरी, २ हजार मि.मी. पर्यंत पडणारे पर्जन्यमान, राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून १० किमी आतमध्ये असणारी शाळा, ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’ न मिळणाऱ्या शाळा, जंगलव्याप्त व हिंस्त्र प्राण्यांचा उपद्रव असणारी गावे आदी निकष देण्यात आले आहेत. यापैकी कोणतेही तीन निकष पूर्ण करणारी शाळा अवघड क्षेत्रातील गणली जाईल. जिल्ह्यात यापूर्वी ३६८ शाळा अवघड क्षेत्रात होत्या, आता नवीन निकषामुळे ही संख्या कमी होणार आहे.
बदल्या पाच टप्प्यांत होणार पहिल्या टप्प्यात रिक्त जागांचे समाणीकरण, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात विशेष १ व २ संवर्गातील शिक्षकांच्या चौथ्या टप्प्यात बदली अधिकारप्राप्त शिक्षक व पाचव्या टप्प्यात बदली प्राप्त या क्रमाने सुरुवातीला प्रशासकीय नंतर विनंती बदल्या होतील. हरकतींसाठी २४ दिवसांचा कालावधी ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया मार्चमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र प्रत्यक्षात बदल्यांमधील निकषात बदल करण्याचे धोरण ७ एप्रिलला जाहीर केले. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर करणे, त्यासाठी ५ दिवसांत हरकती नोंदवणे, शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यावर ७ दिवसांत निर्णय घेणे. त्यानंतर ५ दिवसांत ‘सीईओ’कडे अपील करणे, ‘त्यांनी ७ दिवसांत निर्णय घेणे, असा एकूण २४ दिवसांचा कालावधी दिलेला आहे. यामुळेच बदल्यांची प्रक्रिया ३१ मेपूर्वी पूर्ण होईल की त्याला मुदतवाढ मिळणार, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.