- मोहन राऊतअमरावती - प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत राहावा म्हणून राज्यातील प्रयोगशाळा कर्मचारी इमानेइतबारे अनेक वर्षांपासून काम करीत आहे. तीन वेतन आयोगात राज्यातील १८ हजार प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याने या कर्मचाऱ्यांनी शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. आजाद मैदानावर हे कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत. राज्यात प्रयोगशाळा सहायक, परिचरांची १८ हजार पदसंख्या आहे. राज्य शासनाच्यावतीने या शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांवर दिवसेंदिवस अन्याय वाढत आहे. या कर्मचाºयांना केंद्राप्रमाणे वेतन आयोग लागू असताना प्रयोगशाळा सहायक व परिचरावर राज्य सरकार अन्याय करीत आहे. केंद्र सरकारने चौथ्या वेतन आयोगात १२०० रुपये देण्यात आले. राज्य शासनाने राज्यातील शाळांमध्ये फक्त ९७५ रुपये देऊन अन्याय केला आहे. पाचवा वेतन आयोगात ४ हजारऐवजी ३२०० रुपये, तर सहाव्या वेतन आयोगात फक्त दोन हजार रुपये ग्रेड पे देऊन तोंडाला पाने पुसली आहे. सहाव्या वेतन आयोगात २४०० रुपये ग्रेड पे देण्यात यावा, तर १२ वर्षांनंतर ४२०० रुपये ग्रेड पे देऊन कालबद्ध पदोन्नती लागू करावी. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा सहायक परिचर यांचे पद ते तांत्रिक असल्यामुळे त्यांनाही वरिष्ठ श्रेणी २४०० रुपये व कालबद्ध पदोन्नती लागू करावी. आकृतिबंधमध्ये प्रयोगशाळा परिचरांचे पद व्यपगत करण्याचा डाव रचण्यात आला आहे. ज्या प्रयोगशाळा सहायक व परिचरांच्या भरवशावर प्रात्यक्षिकांची रचना व विज्ञान शिक्षकांना प्रात्यक्षिके देण्यासंबंधी मोठी होते, हेच पद नष्ट करणारा आकृतिबंध तत्काळ रद्द करावा. प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या सुधारित सुधारित आकृतिबंधाला मान्यता द्यावी, १२ वर्ष व २४ वर्षे कालबद्ध पदोन्नती द्यावी, राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी ज्या प्रयोगशाळा सहायक व परिचरांचे प्रात्यक्षिक उत्कृष्ट असते त्या जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्यांना एक वेतन वाढ अधिकची प्रोत्साहन म्हणून द्यावी आदी मागण्या पूर्ण करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
राज्यातील १८ हजार प्रयोगशाळा सहायक, परिचरांचा मागणीसाठी लढा सुरू आहे. यासाठी २६ नोव्हेबर रोजी आजाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करणार आहे.- भरत जगताप राज्याध्यक्ष, प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ मुंबई