अमरावती : महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर बुधवारी शाई फेकण्यात आली. त्यांच्याकडून प्राणघातक हल्ला झाल्याच्या तक्रारीनंतर त्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. प्राणघातक हल्ल्यातील आरोपींच्या तत्काळ अटकेची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. महापालिका शिक्षकांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करून १३ फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याप्रकरणी आमदार रवि राणा यांच्यासह ११ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले आहे.
गुरुवारच्या काम बंद आंदोलनात महानगरपालिका कर्मचारी/कामगार संघ, राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघ, अमरावती महानगरपालिका अभियंता असोसिएशनने सहभागी नोंदविला. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांना दिलेल्या निवेदनातून आयुक्त डॉ. आष्टीकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पसार आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली.
आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आमदार रवि राणा यांच्यासह कमलकिशोर मालाणी, महेश मूलचंदाणी, संदीप गुल्हाने, अजय बोेबडे, अजय मोरय्या, विनोद येवतीकर व तीन महिला अशा ११ जणांवर भादंविचे कलम ३०७, ३५३, ३३२, १४३, १४७, १४८, १४९, २०९, १२० (ब), ४२७, ५००, ५०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.