अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना लस घेण्याकरिता केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे टोकन पद्धती राबविण्यात येत आहे.यात लस घेण्याकरिता केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना फोनद्वारे लसीकरणाची हमी दिल्या जात आहे. केंद्रावर लस उपलब्ध होताच दिवस, वेळ आणि तारीख वैद्यकीय यंत्रणेकडून त्यांना कळविल्या जात आहे. दिलेल्या दिवसावर नागरिक केंद्रावर येऊन लस घेत आहेत .
यातून लसीकरणा करिता केंद्रावर नागरिकांची होणारी गर्दी टळली आहे. नागरिकांना दिलासा मिळाला आहे. केंद्रावरील नागरिकांची रांग यातून नाहीशी झाली आहे.अचलपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांच्या कल्पकतेतून ही टोकण पद्धती अमलात आली असून ती राबविल्या जात आहे. याकरिता त्यांनी साध्या पृष्ठांच्या चाळीस पेट्या तयार ठेवल्या आहेत. यातील काही पेटयांवर कोविशील्ड व काही पेटयांवर कोव्याकसीन या लसीची नावे लिहिली आहे. सोबतच लसीचा पहिला डोज, दुसरा डोज याविषयी माहिती पेटयांवर अंकित आहे.लस घेण्याकरिता उपजिल्हा रुग्णालयातील केंद्रावर प्रवेश घेतेवेळी दर्शनी भागात बाहेरच या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. या पेट्यांच्या बाजूला कोऱ्या कागदांचे तुकडेही ठेवले गेले आहेत. आलेले व येणारे नागरिक या कागदावर आपले नाव, मोबाईल नंबर व शक्य असल्यास आधार नंबर लिहून ती चिठ्ठी, डोज नुसार जी लस हवी असेल त्या पेटीत टाकून निघून जात आहेत.
दर तासाला या पेट्या उघडल्या जात आहेत. त्यातील चिठ्ठ्याची नोंद केंद्रावरील रजिस्टरला घेतल्या जात आहे. लागलीच आपली चिठ्ठी मिळाली.ती रुग्णालयातील रजिस्टरला नोंदल्या गेली. लस उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला फोन द्वारे कळवून केंद्रावर लस घेण्याकरिता बोलावण्यात येईल. असे त्या चिठ्ठीतील मोबाईल नंबरवर आरोग्य यंत्रणेकडून कळविल्या जात आहे. यातून संबंधित नागरिकास आपली चिठ्ठी योग्य ठिकाणी सुरक्षित पोचली असल्याची व आता आपल्याला लस मिळणार असल्याची हमी दिली आहे.
केंद्रावर येणाऱ्यांची व आलेल्यांची संख्या पाहून ठेवल्या जाणाऱ्या पेट्यांची संख्या कमी अधिक केल्या जात आहे.आज अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर पहिल्या डोजकरीता अठराशे तर दुसऱ्या डोज करीता सहाशे लोक प्रतीक्षेत आहेत. केंद्रावर लस उपलब्ध होत नसल्यामुळे केवळ ज्यांचा लसीचा दुसरा डोज आहे अशांनाच दुसरा डोज घेण्याकरिता केंद्रावर बोलाविल्या जात आहे.या केंद्रावरील कोव्हॅक्सीन लस संपली आहे. अनेक लोक या लसीच्या प्रतीक्षेत आहेत.या केंद्रावर केवळ कोविशिल्डचाच दुसरा डोज दिल्या जात आहे. लसीकरणाचा पहिला डोज देने थांबविण्यात आले आहे. दरम्यान डॉ सुरेंद्र ढोले यांच्या अभिनव अशा टोकन पद्धतीतून केंद्रावरील गर्दी ओसरली आहे. ही टोकन पद्धती लक्षवेधक ठरली आहे