तिवसा : नगरपंचायतीच्या कर विभागातील तीन कर्मचाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भूषण यावले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव महादेव गारपवार, शहर सचिव दिलीप शापामोहन, नगरसेवक अनिल थूल, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राज माहुरे व काँग्रेस नगरसेवक अनिल विघ्ने यांनी केली आहे. तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात १४ जून रोजी या विषयात तहसील कचेरीवर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनानुसार, तिवसा नगरपंचायतमधील सन २०२०-२१ या वर्षातील मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व
इतर किरकोळ वसुलीमध्ये नगरपंचायतचे सहायक कर निरीक्षक दीपक खोबागडे यांनी मालमत्ता कराचे पुस्तक
१८ मधील १० हजार ८४६ रुपये, पाणी कर पुस्तक क्र. १ मधील ३४ हजार ९२० रुपये व दुकाण भाडे कर पुस्तक क्र. ३ मधील ३७ हजार ७६२ अशा ८२ हजार ६२८ रुपयांच्या शासकीय निधीची अफरातफर केली. यापूर्वीसुद्धा त्यांनी
२०१९-२० मधील १ लाख ८० हजार ३२१ रुपयांची अफरातफर केल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतचे कनिष्ठ लिपिक सचिन देशमुख यांनी १ लाख २८ हजार ८९२ रुपयांची, तर संगणक परिचालक निखील वानखडे यांनी १२ हजार ९२० रुपयांची अफरातफर केली. मुख्याधिकारी पल्लवी खोटे यांच्या बेजबाबदारपणामुळे हा भ्रष्टाचार सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याप्रकरणी नुकतीच सचिन देशमुख यांना
नुकतेच निलंबित करण्यात आले. परंतु, दीपक खोब्रागडे व संगणक परिचालक निखील वानखडे यांच्यावर कारवाई झालेली नाही. याप्रकरणी १४ जून रोजी तहसील कार्यालयावर निदर्शने व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.