फसवणुकीचा गुन्हा दाखल : ९० कर्मचाऱ्यांची रक्कम केली वळती लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर वीज वितरण कंपनीतील रोखपाल हेमंत जावरकर यांना अफरातफरीप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी विभागीय लेखापालांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी हेमंत जावरकर विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हेमंत सुधाकर जावरकर याने महावितरणमधून निवृत्त झालेल्या जवळपास ९० कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या देय रकमेतून पत्नीच्या नावावर सुमारे २८ लाख ७४ हजार रूपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोटदुखे नामक व्यक्तीने महावितरणकडे तक्रार केली होती. याआरोपात तथ्य आढळल्याने रोखपाल जावरकरला निलंबित केल गेले. यानंतर वीज वितरण कंपनीने एक चौकशी समिती नेमून त्यानुसार १ नोव्हेंबर २०१२ ते ३० नोव्हेंबर २०१६ या चार वर्षांत २९ लाखांचा अपहार केला. चौकशी समितीला हा पूर्ण तपशील शोधण्यासाठी सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी लागला. यानंतर दोन दिवसांपूर्वी महावितरणचे विभागीय लेखापाल राजेंद्र कातखेडे यांनी परतवाडा पोलिसांत तक्रार दिली. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. निलंबित हेमंत जावरकर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विविध माध्यामतून दिल्या जाणाऱ्या रकमेतून वाटा काढण्याचा प्रयत्न करीत होता. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लाभाची नोंद कार्यालयात ठेवणाऱ्या यादीवर तो संपूर्ण रक्कम दाखवायचा तर बँकेला पाठविण्यात येणाऱ्या यादीत तो आपल्या पत्नीच्या नावाचा सामवेश करीत होता. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभातील काही भाग आपसुकच त्याच्या पत्नीच्या खात्यात जमा होत होता. पाच वर्षांपासून त्याचा हा घोळ सुरू होता. महावितरणला पाठविणाऱ्या यादीत त्याच्या पत्नीच्या नावाचा समावेश नसल्याने ही बाब उघडकीस येऊ शकली नाही. चौकशी समितीने अडीच महिने तपासणी केली. त्यामध्ये जावरकर दोषी आढळले. त्यामुळे परतवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. -राजेंद्र कातखेडेविभागीय लेखापाल
रोखपालाच्या निलंबनासाठी अडीच महिने चौकशी
By admin | Published: June 27, 2017 12:05 AM