लोकमत विशेष
नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात श्रीनिवास रेड्डींच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएसच्या नेतृत्वातील पथक गुरुवारी रात्रीच हरिसाल येथे पोहोचले आहे. आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या गैरकृत्यावर श्रीनिवास रेड्डी यांनी पांघरूण घातले. यासह अनेक प्रकारचे गंभीर आरोप करण्यात आले होते. या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी मुंबई येथील अपर पोलीस महासंचालक व सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार ते चौकशी पथक गुरुवारी रात्री हरिसाल येथील निसर्ग संकुलात दाखल झाली.
त्यांनी शुक्रवार व शनिवार वनकर्मचारी अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले. तर, सोमवारी आयपीएस प्रज्ञा सरवदे येणार आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी शासकीय रिवॉल्वरने २५ मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी दीपाली यांनी आत्महत्येचे कारण चिठ्ठीत लिहून ठेवले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी आरंभली, सर्वत्र आक्रोश पाहता घटनेचे गांभीर्य पाहून शासनाचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या समित्यांमार्फत चौकशी सुरू केली आहे. त्यानुसारच मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी भापोसे प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली होती. त्यांना ३० एप्रिलपर्यंत अहवाल द्यायचा आहे.
बॉक्स
श्रीनिवास रेड्डी वरील आरोपांची होणार चौकशी
तत्कालीन अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी अनेक प्रकारचे गंभीर आरोप आहेत. विनोद शिवकुमार याच्याकडून मानसिक छळ होत असल्याची बाब श्रीनिवास रेड्डी यांच्या निदर्शनास वेळोवेळी आणली होती. तरीदेखील रेड्डी यांनी आवश्यक ती दखल घेऊन उचित कारवाई न केल्याचा ठपका असल्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. त्यामुळे रेड्डी हे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरले का किंवा कसे याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रज्ञा सरवदे सोमवारी हरिसाल येथे येणार आहेत.
बॉक्स
दीपालींच्या पतीचे बयाण नोंदविणार
हरिसाल येथील निसर्ग निर्वाचन संकुलात पोहोचलेल्या चार सदस्य पोलीस अधिकाऱ्यांच्या चमूने शुक्रवार व शनिवारी चिखलदरा, हरिसाल व क्षेत्रीय व्याघ्र प्रकल्प व गुगामल वन्यजीव विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बयाण या चमूने नोंदविले. दीपाली चव्हाण यांच्या आईचे बयाण आयपीएस प्रज्ञा सरवदे यांनी त्यांच्या सातारा येथे घरी जाऊन नोंदविल्याचे सूत्रांनी सांगितले. पती राजेश मोहिते यांचे बयाण सोमवारी नोंदविले जाणार आहे. त्यासोबतच काही संघटनांचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांचेही बयाण नोंदविले जाणार आहे.