अमरावती : पोटफुगीवर उपचार म्हणून आठ महिन्यांच्या चिमुकल्यावर गरम विळ्याचे चटके देण्याचा अघोरी प्रकार चिखलदरा तालुक्यात घडला. सदर आठ महिन्याच्या चिमुकल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक पाचमध्ये उपचार होत आहेत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी जिल्हा रुग्णालय गाठून त्या चिमुकल्याच्या प्रकृतीची चौकशी केली. योग्य उपचार करण्याचे निर्देश रुग्णालय यंत्रणेला दिले.
चिखलदरा तालुक्यातील बोरधा येथील गावात पोटफुगी झालेल्या आठ महिन्यांच्या चिमुकल्यावर उपचार करण्यासाठी त्याच्या पालकांनी त्याला रुग्णालयात न नेता भगता (भूमका)कडे नेले. भगताने सांगितल्याप्रमाणे पालकांनी मुलाच्या पोटावर चटके दिले. हा प्रकार कळताच काटकुंभ येथील भरारी पथकाने तत्काळ त्या चिमुकल्याला चुरणी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांकडून बालकावर उपचार करणारी दाई व बालकाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची दखल घेऊन ना. ठाकूर यांनी इर्विन रूग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सध्याच्या कोरोना संकटकाळात आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेऊन कोरोनाबाधितांवर उपचार करत असताना दुसरीकडे चिखलदरा तालुक्यात हा अघोरी उपचाराचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेत आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.