समिती नियुक्त, ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार
धामणगाव रेल्वे : घरी शौचालय बांधल्यानंतर रस्त्यावर शौचास बसणाऱ्या ग्रामस्थांवर ग्रामपंचायतीने कोणतीच कारवाई न केल्यामुळे आता ग्रामसेवकांची चौकशी करण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली आहे.
प्रत्येकाने घरोघरी शौचालय बांधावे, त्याचा वापर नियमितपणे करावा, यासाठी केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना राबविल्या. सहा वर्षांत तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक शौचालये बांधण्यात आले. तरीही पाच हजारांपेक्षा अधिक ग्रामस्थ दररोज रस्त्यावर शौचास बसत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी गटविकास अधिकारी माया वानखडे, तर जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रशांत सातव, धनंजय तिरमारे, बाळू बोर्डे, दिनेश गाडगे यांची नियुक्ती केली आहे. ही समिती प्रत्येक ग्रामपंचायतीत जाऊन आतापर्यंत बांधलेल्या शौचालयांची चौकशी करणार आहे.
संबंधित ग्रामसेवकाने किती ग्रामस्थांवर कारवाई केली, याची माहिती ही समिती घेणार. आठ दिवसांत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसा अहवाल सादर करावा लागणार आहे. रस्त्यावर शौचास बसणे ही गंभीर बाब असून स्थानिक ग्राम समिती काय करते, असा सवालही नवनियुक्त मुख्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. दोषींवर त्वरित कारवाईचे निर्देश संबंधित समितीला देण्यात आले आहे.
- तर फौजदारी करा
जे ग्रामस्थ शौचालयाचा वापर करीत नाही, त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई दोन दिवसांत करण्याचे निर्देशही नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहे. ज्या गावांना पुरस्कार प्राप्त झाले, त्या गावातील ग्रामस्थ रस्त्यावर शौचास बसत असेल तर येथील ग्रामसेवक काय करतात, असा सवालही नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना केला.