अमरावती : अमरावती ते नरखेड रेल्वे मार्गावर वलगावनजीकच्या शिराळा येथे स्वांतत्र्यदिनाच्या मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे २२ डबे घसरले. या अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे प्रबंधकांनी घेतला आहे. त्याअनुषंगाने अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रंबधक, रेल्वे सुरक्षा बलाच्या निरीक्षकांना पाचारण करण्यात आले आहे.
डीआरएम एस.एस. केडिया यांनी नरखेड मार्गावर २२ मालगाडीचे डबे घसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, अपघातस्थळी अनेक ठिकाणाहून फिशप्लेट गायब झाल्याचे त्यांच्या पाहणी दौऱ्यात लक्षात आले आहे. त्यामुळे हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय रेल्वेच्या वरिष्ठांना आला आहे. आता या अपघातप्रकरणी चौकशी नेमली जाणार आहे. या मार्गावर पहिल्यांदाच अशा मोठ्या अपघाताची नोंद झालेली आहे. प्रवासी गाडीचा अपघात झाला असता तर मोठी मनुष्यहानी झाली असती, अशी नाेंदही पाहणी दौऱ्यात करण्यात आली आहे. तब्बल ४८ तासांपर्यंत अपघातग्रस्त मालगाडीचे डबे उचलण्याचे कार्य युद्धस्तरावर सुरू असल्याची माहिती आहे. अमरावती, बडनेरा, अकोला व भुसावळ येथील अभियंते, अधिकारी यांची फौज निरंतरपणे कार्यरत होती, हे विशेष.
------------------
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुर्लक्ष
नरखेड रेल्वे मार्गावरून ठराविक प्रवासी गाड्यांची वाहतूक असते. तसेच हा मार्ग मालवाहतुकीसाठी वापरला जातो. या मार्गावरुन गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या नोंदी हा मार्ग दुर्लक्षित आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरट्यांनी रूळाच्या फिश प्लेट गायब केल्याचे दिसून येते.
---------------------------
वरिष्ठ सुरक्षा अधिकारी करणार चौकशी
नरखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे २२ डबे घसरल्याप्रकरणी भुसावळ विद्युत विभागाचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी हे चौकशी
करणार आहेत. संबंधित अधिकाऱ्यांचे बयाण नोंदविले जाणार असून, रेल्वे रूळाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांवर कार्यवाही निश्चित होणार आहे. त्यानुसार भुसावळ येथे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.