अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मुख्य भागात राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचा आर्कषक असा शिलालेख उभारलाजाणार आहे. गुरूवारी पार पाडलेल्या अधिसभेत सदस्य डॉ. संतोष बनसोड यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली असून, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा अभिनव उपक्रम ठरणार आहे.
डॉ. संतोष बनसोड यांनी या प्रस्तावाच्या अनुषंगाने सभागृहात मत व्यक्त करताना भारतीय राज्यघटनेची उद्देशिका हे संविधानाची मूलभूत तत्वे आणि उद्दिष्टये सांगणारे प्रास्ताविक विधान आहे. भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणले. भारतीय संविधानाची उद्देशिका ही संविधानाचे एक संक्षिप्त स्वरूप आहे. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय संविधान लागू होवून ७४ वर्ष पूर्ण झाले आणि ७५ व्या वर्षात म्हणजेच अमृत महाेत्सवी वर्षात पदार्पण झाले आहे.
जगात सर्वात मोठा लोकशाहीचा देश म्हणून भारताची ओळख आहे. लोकशाहीचे संवर्धन करून तिला बळकट करण्याचे काम भारतीय संविधान करते. भारतीय संविधानाने समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या शास्वत मुल्यांची देणं ही भारतीय नागरिकांना दिलीच नाही तरती नागरिकांमध्ये रूजविली आहे. विद्यापीठीय विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक नितीमत्ता निर्माण करणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असल्याचे कायद्यात नमूद आहे. त्यामुळे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना प्रशासकीय ईमारतींच्या दर्शनी भागात राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या शिलालेख उभारण्यात यावा आणि विद्यापीठाने संविधान महोत्सवाचे आयोजन करावे, असा प्रस्ताव देखील त्यांनी मांडला. या प्रस्तावाला सिनेट सभेत एकमताने मंजुरी मिळाली असून, येत्या काळात अमरावरी विद्यापीठात संगमवरी दगडात सुंदर आणि आकर्षक असा राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचा शिलालेख उभारला जाणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात विद्यापीठात राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचा शिलालेख उभारला जाणे ही माझ्या कार्यकाळात मोठी उपलब्धी मानली जाईल. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता दिली असून, त्या जोपासल्या गेल्या पाहिजे. - डॉ. मिलींद बारहाते, कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ.