प्रदीप भाकरे, अमरावती: ब्रेकअपनंतर ‘लव्ह इन रिलेशनशिप’चा आग्रह धरून अल्पवयीन प्रेयसीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तथा प्रेयसीचा विनयभंग करण्यात आला. २ मे रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी श्रवण चांदूरकर याच्याविरूध्द विनयभंग, धमकावणे व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी श्रवणने भावाला धमकावल्यामुळे अल्पवयीन मुलीने आईसह गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले होते. तक्रारीनुसार, अल्पवयीन मुलगी व श्रवण यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. मात्र अलिकडे त्याचा त्रास वाढू लागल्याने तिने त्याच्यासोबतचे प्रेमसंबंध संपुष्टात आणले. तिने ब्रेकअप केले. तरीदेखील तो तिला फोन करून प्रेम संबंध ‘टू बि कन्टिन्यूड’ ठेवण्यासाठी त्रास देऊ लागला. फोनवर तो वारंवार तेवढेच बोलायचा. पिडिताने प्रत्येकवेळी त्याला नकार दिला. मात्र त्यानंतरही पिडिताच्या शिकवणी वर्गाबाहेर जाऊन तो तिला रिलेशनशिप सुरू ठेवण्यासाठी धमकावत राहिला. तो तिचा पाठलाग करत राहिला.
चालू राहू दे, अन्यथा...
२ मे रोजी श्रवण चांदूरकरने पिडिताच्या भावाला फोन करून राठीनगरच्या उद्यानाजवळ बोलावले. तेथे तुझ्या बहिणीचे माझ्याशी असलेले प्रेमप्रकरण चालू राहू दे, अन्यथा तुझ्या बहिणीसह तुला देखील जीवाने संपवेन, अशी गर्भित धमकी दिली. तथा तिच्या भावाला मारहाण देखील केली. तो प्रकार त्याने कुटुंबियांच्या कानावर घातला. त्यामुळे पिडिताने कुटुंबासोबत पोलीस ठाणे गाठले.