रेबीजचा संशयित रुग्ण : अन्य श्वानाने चावा घेतल्याचा अंदाजअमरावती : जाधव यांच्या बंगल्यातील चौकीदार विनोद भारती रेबीजचा संशयित रुग्ण असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या वृत्ताची दखल महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने घेतली. सोमवारी स्वास्थ्य निरीक्षक पंकज कल्याणकर यांनी त्या श्वानाची पाहणी करून चौकशी केली. रेबीजबाधित श्वानापासून पसरणार हा आजार जीवघेणा आहे. रेबीजबाधित श्वानाने चावा घेतल्यास मनुष्यसुद्धा श्वानाप्रमाणे वागणूक करीत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. रविवारी सकाळी पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवास स्थानासमोरील जाधव यांच्या बंगल्यावर विनोद भारती नामक चौकीदार चवताळलेला व आक्रमक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. विनोद भारती हे श्वानाप्रमाणे वर्तणूक करीत असल्याचे जाधव कुटुंबीयांसह पोलिसांच्याही निदर्शनास आले. त्यामुळे दोरखंडाने हातपाय बांधून त्यांना तत्काळ इर्विन रुग्णालयात नेले. डॉक्टरांच्या सल्ल्याने भारतींना नागपूर हलविण्यात आले. त्यांच्यावर योग्य तो उपचार सुरू करण्यात आले आहे. शहरात रेबीजचा रुग्ण आढळल्याची ही वर्षभरातील पहिलीच घटना आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी एस.एस.गावंडे यांनी दखल घेत सोमवारी स्वास्थ्य निरीक्षकांना जाधव यांच्या बंगल्यावर चौकशीकरिता पाठविले. कल्याणकर यांनी त्या श्वानाची पाहणी केली. जाधव यांच्या कुटुबीयांना विचापूसही केली. त्यावेळी आक्रमक झालेले भारती हे बंगल्यावरील श्वानाची छेड काढत असल्यामुळे त्याने चावा घेतल्याची माहिती समोर आली. मात्र, तो श्वान सामान्य स्थितीत असल्याचे स्वास्थ निरीक्षकांच्या निर्देशनास आले. त्यामुळे विनोद भारती यांना अन्य एखाद्या बाधित श्वानाने चावा घेतल्याचा अंदाज स्वाथ्य निरीक्षक पंकज कल्याणकर यांनी वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
"त्या" श्वानाची स्वास्थ्य निरीक्षकाकडून पाहणी
By admin | Published: April 04, 2017 12:22 AM