अमरावती : अतिवृष्टीमुळे घरांची व शेतीची मोठी हानी झाली. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई मिळण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. आपद्ग्रस्तांना शक्य ती सर्व मदत मिळवून देऊ, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
पालकमंत्री ठाकूर यांनी गुरुवारी खारतळेगाव, रामा, साऊर, टाकरखेडा संभू आदी अतिवृष्टिग्रस्त भागाची पाहणी केली. ग्रामीण नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी खारतळेगाव येथील अतिवृष्टीने आलेल्या पुरात वाहून गेलेल्या युवकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना तात्काळ मदत, सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी कार्यवाहीचे निर्देश दिले. उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार नीता लबडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.
--------------
शासन पूरग्रस्तांच्या खंबीरपणे पाठीशी
खारतळेगाव येथील पुरात प्रवीण गुडधे, निरंजन गुडधे हे युवक वाहून गेले. या दोहोंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पालकमंत्र्यांनी त्यांची व्यथा जाणून घेतली व सांत्वन केले. घरातील व्यक्ती जाण्याचे दु:ख मोठे आहे. आपण स्वत: एक कुटुंबीय म्हणून या कुटुंबाच्या कायम पाठीशी राहू. या कुटुंबांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी दिलासा दिला. यावेळी पालकमंत्र्यांकडूनही १० हजार रुपयांची तातडीची मदत करण्यात आली.
--------------
भरपाईसाठी सविस्तर प्रस्ताव पाठवा
अतिवृष्टीने रामा येथे भिंतीची पडझड तसेच धान्य, कडबा भिजून नुकसान आदी हानी झाली आहे. साऊर येथेही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. या सर्व गावांतील घरांच्या पडझडीबाबत पंचनामे करण्यात आले. त्याचप्रमाणे, शेतीच्या नुकसानीचेही परिपू्र्ण व सविस्तर पंचनामे करावे. प्रत्येक बाबीची नोंद घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
----------------
रेणुका नाल्याचे खोलीकरण आवश्यक
टाकरखेडा संभू येथील रेणुका नाला व इतर परिसराची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत भवन येथे पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करून तेथील समस्या जाणून घेतल्या. काही वर्षांपूर्वी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नाने नाला खोलीकरणाचे काम झाले होते. त्यामुळे पूरहानीचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे पुन्हा नाला खोलीकरण करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रेणुका नाल्याचे खोलीकरणाचे काम निश्चितपणे पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
----------------
पूरसंरक्षणासाठी उपाययोजना
पूरसंरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक भिंत, नाला खोलीकरण, शेतात जाण्याची अडचण होऊ नये म्हणून चांगले पांदण रस्ते आदी विविध कामे हाती घेण्यात येतील. अशा कामांसाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाने शेतकरी बांधवांशी संवाद साधून प्रत्येक नुकसानाची अचूक दखल घ्यावी. एकही पात्र व्यक्ती भरपाईपासून वंचित राहू नये, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी दिले.