अमरावती : शहरातून बडनेराकडे जाणाऱ्या जुन्या बायपासवरील कस्तुरबा गांधी उद्यानाची दुरवस्था, तेथील अतिक्रमणविषयक वृत्त समाज माध्यमांवर येताच महापौर चेतन गावंडे यांनी सोमवारी पाहणी केली, येथीळ अतिक्रमण काढून उद्यानाची स्वच्छता करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
कस्तुरबा गांधी उद्यानाचे उद्घाटन ५ नोव्हेंबर,१९८२ रोजी तत्कालीन मंत्री सुरेंद्र भुयार यांच्या हस्ते झाल्याची नोंद येथील कोनशिलेवर दिसून येते. प्रवेशद्वारावरील नाव, रंग सर्व उडालेला आहे. प्रवेश द्वारातून आत गेल्यावर उद्घाटनाची अस्पष्ट आहे. आज या संपूर्ण जागेवर परिसरातील लोकांचे ट्रक व रस्ता बांधकाम करणाऱ्या मजुरांची वस्ती दिसून येते. उर्वरित क्षेत्रात झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सदर जागेबाबत प्राथमिक माहिती घेतली असता, सदर जागा महानगरपालिकेची नसल्याचे माहिती समोर आली. महापौरांनी कस्तुरबा गांधी बालोद्यानासंदर्भात बैठक लावून या जागेबाबत न्यायालयीन बाबी तपासण्याच्या सूचना यावेळी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावरील मजुरांकडून ही जागा लवकर खाली करण्यात येईल, असे यावेळी संबंधितांना सांगितले. यावेळी नगरसेवक प्रकाश बनसोड, नगरसेविका गंगा अंभोरे, सहायक आयुक्त विशाखा मोटघरे, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, अभियंता दीपक खडेकार आदी उपस्थित होते.