अमरावती : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुषंगाने करारानुसार उपलब्ध झालेल्या शासकीय रुग्णालयांच्या इमारतीमध्ये किरकोळ बदल, तसेच दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहेत; परंतु मेडिकल कॉलेजसाठी आवश्यक ड्रेनेज सिस्टम तसेच करावे लागणारे बदल लक्षात घेता, अधिष्ठाता डॉ. अनिल बत्रा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत त्याचे अवलोकन केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम हे डफरीन परिसरात सुरू आहे. येथील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राची इमारत खाली करण्यात आली असून, तेथे आवश्यक किरकोळ बदल करून महाविद्यालयाचे प्रथम वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातच महाविद्यालय सुरू करण्याच्या अनुषंगाने कामाला गती देण्यात आली आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयदेखील वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या या बांधकामामध्ये येत असलेल्या काही अडचणी लक्षात घेता, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देत तेथील इमारतीचे स्ट्रक्चर कशा प्रकाराचे आहे, याची पाहणी केली. मुलांच्या क्षमतेनुसार महाविद्यालयात किती टेबल लागतील, त्याची उंची किती असेल, महाविद्यालयातील ड्रेनेज सिस्टम तसेच आवश्यक इतर सोयीसुविधांच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली. या अवलोकनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाला गती मिळेल, असा विश्वास अधिष्ठाता डॉ. बत्रा यांनी व्यक्त केला. यावेळी पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता तेजस काळे, अभियंता प्राजक्ता गोडे, डॉ. पवन टेकाडे व अधिष्ठाता यांचे स्वीय सहायक विशाल इंगळे उपस्थित होते.