अमरावती: केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांची ९ मार्चपासून केंद्राच्या पथकाकडून जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन ‘ऑन द स्पॉट’ स्वच्छता जलजीवन मिशनच्या कामांची तपासणी दोन सदस्यीय समितीकडून केली जात आहे. आतापर्यंत अमरावती व अचलपूर या दोन तालुक्यांतील १६ गावांपैकी १३ गावांची केंद्रीय पथकाने तपासणी केली आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशनच्या कामांच्या तपासणीसाठी केंद्रीय पथकात व्होरा प्रसाद राव व अजय सक्सेना या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या दोन सदस्यीय पथकाने अमरावती आणि अचलपूर तालुक्यातील १६ गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन येथील वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व जलजीवन मिशनअंतर्गत वैयक्तिक कुटुंबाकडील नळजोडणी, तसेच पाणी गुणवत्ताविषयक बाबींची तपासणी, पाणी स्रोतातील पाणी नमुने, पाणीपुरवठा करणाऱ्या टाकी, शाळा अंगणवाडी आदी ठिकाणी भेटी देऊन तेथे विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आदींसोबत संवाद साधून त्यांच्याकडून काही समस्या आहेत का, याची पडताळणी केलेली आहे. याशिवाय स्थानिक नागरिकांशी संवाद साधून नळजोडणीद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी मिळत आहे किंवा नाही, याबाबतही माहिती जाणून घेतली.यासोबतच गावातील वैयक्तिक शौचालय कुटुंबाची ऑनलाइन यादी, सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची पाहणी, ग्रामीण आरोग्य पोषण आहार, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त दस्तऐवज तपासणी, पाणी गुणवत्ताविषयक तपासणीकरिता निवड केलेल्या पाच महिलांकडून तपासणी केलेल्या कामाची माहिती आदींचा लेखाजोखा केंद्रीय चमूने १३ गावांत प्रत्यक्ष जाऊन तपासला आहे. या पथकांच्या तपासणीचा गुरुवार, १४ मार्च हा अखेरचा दिवस आहे. तपासणीदरम्यान यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा, तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी कर्मचारी, एमजीपीचे अभियंता, बीडीओ विस्तार अधिकारी यादरम्यान उपस्थित होते. ...या गावांना भेटीजिल्हा मुख्यालयात आढावा घेतल्यानंतर केंद्रीय चमूने गत दोन तीन दिवसात अचलपूर तालुक्यातील धामणगाव गढी, अंबाडा कंडारी, असदपूर, बळेगाव, भिलोना, अमरावती तालुक्यातील लोणटेक, मलकापूर, वडगाव माहोरे, अंजनगाव बारी, कुंड सर्जापूर, कठोरा बु., नांदुरा पिंगळाई, अचलपूरमधील बेलखेडा, भुगाव आदी गावांत ‘ऑन द स्पॉट’ कामांची तपासणी व नागरिकांसोबत थेट संवाद साधला जात आहे.