(फोटो)
अमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सोमवारी शहरातील कृषिउत्पन्न बाजार समिती, इतवारा बाजार व नागपुरी गेट येथील लसीकरण केंद्रांची पाहणी केली.
बाजारातून व्यापाऱ्यांनी दुकानदार व हातगाडीधारकास भाजीपाला व फळांची विक्री करावी. येथे नागरिकांना या ठिकाणी भाजीपाला व फळ घेण्यास मनाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी कृषिउत्पन्न बाजार समितीने घ्यावी. प्रत्येक विक्रेता व खरेदीदाराने मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करावे. व्यापारी, दुकानदार, कामगार यांनी आरटी-पीसीआर टेस्ट करुन घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
दुकानदारांनी साहित्य दुकानातच ठेवले पाहिजे. दिलेल्या वेळेतच दुकान उघडावे. गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हातगाडीधारकांनी एका जागी उभे न राहता ग्राहकांच्या घराजवळ जाऊन भाजीपाला व फळांची विक्री करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी तहसीलदार संतोष काकडे, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, सहायक आयुक्त योगेश पिठे, डॉ. विशाल काळे, डॉ. फिरोज खान, डॉ. पौर्णिमा उघाडे, बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण उपस्थित होते.
बॉक्स
केंद्रावर गर्दी टाळा
जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी नागपुरी गेट येथील लसीकरण केंद्राला भेट दिली. केंद्रावर त्रिसूत्रीच्या पालनासह गर्दी टाळण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत, त्यांनी लसीकरण झाल्यानंतरही मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सतत हात धुणे ही कोरोना प्रतिबंधाची त्रिसूत्री अवलंबण्याची गरज असल्याचे सांगितले.