अमरावती : पावसाळ्यात ग्रामीण भागातील जलस्रोत मोठ्या प्रमाणात दूषित होत असतात. परिणामी गावात साथरोगाचा प्रादुर्भाव होत असतो. हे टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता तसेच आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील जलस्रोतांची तपासणी केली जाणार आहे.
पिण्याचे पाणी, परिसर व वैयक्तिक स्वच्छता या घटकांचा आरोग्याशी संबंध आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी त्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी गुणवत्ता व संनियंत्रण कार्यक्रमांमध्ये स्वच्छता सर्वेक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वैयक्तिक सवयी व सार्वजनिक अस्वच्छता, नळ पाणीपुरवठा यंत्रणेतील तांत्रिक दोष या कारणांमुळे पाणी दूषित होते. हे दूषित पाणी सेवन केल्यास विविध जलजन्य आजार होऊ शकतात. त्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागातील जलस्रोतांची तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे.
सद्यस्थितीत पावसाळ्यापूर्वीच या अभियानामध्ये विविध तालुक्यांतील जलस्रोतांची तपासणी करण्यात आली. जलसुरक्षक व आरोग्य विभागाच्या मदतीने पावसाळ्यापूर्वी १०० टक्के जलस्रोतांच्या नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी दिली.
ग्रामपंचायतींनी सतर्क राहून सर्व जलस्रोतांची स्वच्छता करावी. पावसाळ्यात कोणालाही दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या. पाईप लाईन दुरुस्ती, गटार, नाले, साफसफाई, विहिरीतील गाळ काढणे, विहिरीची स्वच्छता, पाणीपुरवठ्याच्या स्रोतांची स्वच्छता, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाण्यामध्ये टीसीएलचा वापर व साठवणूक आदी कामे प्राधान्याने हाती घ्यावेत, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिल्या.