अमरावती: काही वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली. टेलिफोनिक संवादाबरोबरच ते सोशल मीडियावर देखील व्यक्त होऊ लागले. मात्र तो अधिकच अधिकार गाजवू लागल्याने व अन्य कारणांमुळे काही दिवसांपुर्वी त्यांच्यात विसंवाद झाला. त्याचे रुपांतर ब्रेकअपमध्ये झाले. मात्र ते तो पचवू शकला नाही. त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरी अपलोड केली. त्यामुळे तरूणीची बदनामी झाली. अखेर तिने तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठून तेथे आपबिती कथन केली. पोलिसांनी ६ मार्च रोजी दुपारी आरोपी सिमरान अली शफाकत अली (२७, जयस्तंभ चौक, तळेगाव दशासर)याच्याविरूध्द विनयभंग, धमकी व ॲट्रासिटीअन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, फिर्यादी हिची आरोपीसोबत ओळख होती. ते एकमेकांशी फोनवर बोलत होते. त्यांच्यात मेसेजची देखील आदानप्रदान होत होती. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याने फिर्यादी तरूणीने स्वत:चा मोबाईल क्रमांक बदलविला. दरम्यान, ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास फिर्यादी तरूणी मोबाईल पाहत असताना आरोपीने तिला क्रेझीगर्ल या फेक इन्स्टा आयडीवरून स्टोरी पाठविली. ती फिर्यादीने पाहिली. त्यानंतर त्याच नंबरवरून तिला मेसेज आले. तिने त्या मेसेजला रिप्लाय दिला नाही. मात्र क्रमांक तपासला असता, तो आरोपी सिमरान अली याचा असल्याचे समजले.धमकीचे मेसेजआरोपीने मेसेजद्वारे फिर्यादीच्या आई वडिलांना शिविगाळ केली. उदया सकाळी दहा वाजेपर्यंत धामणगांवला पोहोच नाहीतर, तुला पाहून घेईन, अशी मेसेजद्वारे धमकी दिली. याबाबत फिर्यादीने तिच्या आई वडिलांना सांगितले. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले. आरोपीसोबत आपला आता कोणताही संबंध नाही. तरी देखील तो आपली ईच्छा वा आपल्याकडून कुठलाही प्रतिसाद नसतांना इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून आपल्याला त्रास देत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले.