मुलाला पुन्हा पायांवर उभे करण्याची धडपड, झाडू पाठीच्या कण्याला लागण्याचे झाले निमित्त
अमरावती : खेळताना सहकाऱ्याकडून झाडूची मूठ पाठीला लागली आणि क्षणात अक्षदचे कंबरेपासून खालचे शरीर लुळे पडले. त्याला पुन्हा आपल्या पायांवर उभे करण्यासाठी चिंताग्रस्त आई मदतीची हाक देत आहे.
१० वर्षाचा चिमुकला अक्षद हा आई रश्मी ठाकरे यांच्यासोबत सांगाणीनगरात राहतो. त्याची आई रश्मी शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. २८ एप्रिल २०२० रोजी अक्षद हा कुटुंबातील काही चिमुकल्या सदस्यांसोबत खेळत होता. खेळता-खेळता एका लहान मुलाच्या हातातील झाडू अक्षदच्या पाठीवर लागला. तो पाठीच्या कण्यावर लागल्यामुळे अक्षदला प्रचंड वेदना झाल्या आणि त्याचे खालचे अर्धे शरीरच निकामी झाले. कुटुंबीयांनी त्याच्यावर शहरात व नागपूर येथे उपचार केले. नागपूर येथे शस्त्रक्रियादेखील केली.
--------------
वेदनेतही चेहऱ्यावर हसू
अक्षद आता हाताच्या साहाय्याने शरीर उचलून पुढे-मागे सरकतो. परंतु, यामुळे त्याच्या कमरेखाली एक जखम झाली आहे. सवंगड्यांसोबत खेळता येत नसल्याचे अतीव दु:ख असूनही त्याच्या चेहऱ्यावर हसू असते.
बॉक्स
मदतीसाठी येणार का कुणी?
रश्मी ही वडील रमेश साबळे यांच्याकडे राहून शिवणकामातून मिळणाऱ्या पैशांवर अक्षदचा सांभाळ करीत आहे. त्याच्यावरील उपचारासाठी मदत देणारे हात पुढे यावेत, अशी या कुटुंबाची अपेक्षा आहे. जिल्हा प्रशासन किंवा सामाजिक संस्थांनी अक्षदच्या वेदना जाणून घेतल्या तर तो भविष्यात स्वत:च्या पावलांनी पुन्हा चालू शकेल.