अमरावती: चांदूरबाजार येथील एका ५७ वर्षीय महिलेची ४० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. अज्ञात दोन भामट्यांनी त्या महिलेकडील आठ ग्रॅमची सोन्याची पोत हातचलाखीने एका पुडीत बांधली. ती पुडी उघडून पाहिली असता त्यात सोन्याच्या पोतीऐवजी रेतीचे खडे आढळून आले. १६ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास चांदूरबाजार येथे ही घटना घडली. याप्रकरणी चांदूरबाजार पोलिसांनी रात्री ८ च्या सुमारास अज्ञात दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला.
चांदूरबाजार येथील एक ५७ वर्षीय महिला तिच्या घराबाहेर असताना दोन अनोळखी इसम शेजारील दुकानाच्या ओट्यावर आले. त्यांनी महादेवाच्या मंदिरात वर्गणी द्यायची आहे असे म्हणून एका कागदावर चार हजार रुपये ठेवले. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याची पोत मागितली. महिलेकडील आठ ग्रॅमची सोन्याची पोत घेऊन त्या कागदाची पुडी बांधून महादेवाचे पिंडीला स्पर्श करून करून या, असे महिलेला बजावले. त्यावर फिर्यादी महिला ही मंदिराकडे निघाली असता तिला नारळ आणण्याचे कारण देऊन थांबविले. त्या एक दोन मिनिटात महिलेला काहीएक समजले नाही. काही वेळाने महिला भानावर आली. त्यांनी कागदाची पुडी सोडून पाहिली असता त्या पुडीत सोन्याच्या पोतीऐवजी रेतीचे खडे दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने चांदूरबाजार पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात चांदूरबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.