अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आता ग्रामीण भागातीलही होम क्वारंटाईन रुग्णांना आता संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या ८,१७७ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. यापैकी ग्रामीण भागात ६,४४७ रुग्ण आहेत. शासनादेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश मंगळवारी जारी
केले. ग्रामीण भागातील होम आयसोलेशनमध्ये असणारे असिम्टमॅटिक रुग्ण घराबाहेर दिसतात. कुटुंबात मिसळतात. १४ दिवस गृहविलगीकरणात राहत नाही. त्यामुळेही ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता गृह विलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. या सर्व रुग्णांचे ग्रामस्तरीय समितीच्या निर्णयानुसार टप्प्याटप्प्याने संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
शाळा, समाजमंदिरांचा वापर
प्रत्येक तालुक्यात कोरोना केअर सेंटर आहे. मात्र, या ठिकाणी बेडची संख्या अपुरी असल्याने आता प्रत्येक तालुक्यातील किमान १० शाळांमध्ये अशा संक्रमितांची व्यवस्था करणार आहे. याशिवाय समाजमंदिरासारख्या अन्य सोयीच्या जागीदेखील सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. तेथे वीज, पाणी, स्वच्छतागृह व इतर सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.
बॉक्स
कंट्रोल रूम तयार करणार
संक्रमित रुग्णांशी संवाद साधण्यासाठी आता कंट्रोल रूम तयार करण्यात येणार आहे. अनेक रुग्ण चाचणी एका तालुक्यात व निवासी अन्य तालुक्याचे असल्याने आरोग्य यंत्रणेचा संपर्क होणे महत्त्वाचे आहे. याशिवाय ग्राम समितीच्या मदतीसाठी आरोग्य यंत्रणेचे पथकही तयार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.
कोट
ग्राम समितीच्या सहकार्याने आता होम आयसोलेशनमधील रुग्ण टप्प्याटप्प्याने संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले जातील. नवे पॉझिटिव्हदेखील या केंद्रांमध्ये ठेवले जातील.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी