अमरावती : जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात नियोजनात मंजूर केलेली सर्व कामे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश बांधकाम समितीचे सभापती सुरेश निमकर यांनी दिले आहेत.
झेडपी बांधकाम विषय समितीची सभा २४ मार्च रोजी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात निमकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला सदस्य प्रताप अभ्यंकर, दत्ता ढोमणे, सारंग खोडस्कर, राधिका घुईखेडकर, कार्यकारी अभियंता नीला वंजारी आदी उपस्थित होते. यावेळी बांधकाम विभागाच्या अखत्यारितील सर्व उपअभियंतांकडून बांधकामाचा कामनिहाय आढावा सभापतींनी पहिल्याच बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी शासनाकडून तसेच जिल्हानिधीतून मंजूर केलेली कामे ही चालू आर्थिक वर्षात पूर्ण करावीत यात कुणीही मागे पडता कामा नये, बांधकामासाठी आलेला निधी शासनाकडे परत जाता कामा नये, निधी परत गेल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाईचा इशारा सभापतींनी दिला आहे. यावेळी विश्रामगृहाच्या मुद्यावरही सभापती, सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला सभापतींनी दिलेत.