अमरावती : राज्यातील गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील वस्त्या, रस्त्यांची नावे बदलवून नवीन नावे देण्यात यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना लेखी आदेशाद्वारे २२ जून रोजी दिले.
राज्यातील अनेक शहरे व ग्रामीण भागातील अनेक गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून अशा जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत शासनाने एका आदेशान्वये कळविले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जातिवाचक नावे शोधून ती बदलविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला निर्देशित केले. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील अशी नावे शोधण्यात यावी, विहित कार्यपद्धती अवलंबून अशा जातिवाचक नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याबतबात गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर कार्यवाही करावी व याबाबतची एकत्रित माहिती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त सीईओंनी १४ गटविकास अधिकारी यांना दिले आहेत.