अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : कारंजा लाड (जि. वाशिम) वनपरिक्षेत्रात ज्या लोखंडी ट्रॅपमध्ये बिबट अडकला होता, तो कटनी ट्रॅप व त्याचाशी संबंधित शिकाऱ्यांच्या बहेलिया गँगबाबत सर्वंकष चौकशीचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी ९ फेब्रुवारी रोजी दिले.
कारंजा लाड वनपरिक्षेत्रातील आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील लोखंडी फासात अडकलेल्या बिबट्यांचा लिमये यांनी आदेशात उल्लेख केला आहे. लोखंडी फास लावून वन्यजिवांच्या होणाऱ्या शिकारीबाबत सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. या दोन्ही घटनांमध्ये वापरले गेलेले लोखंडी फास बघता, वन्यजिवांची शिकार करणाऱ्या बहेलिया शिकाऱ्यांनी पुन्हा शिरकाव तर केलेला नाही ना, याची खात्री करण्यास त्यांनी सुचविले आहे.
मोबाइल संदेश तपासणार
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सायबर सेलसह नजीकच्या सेल ऑपरेटरची संपर्क साधून संशयित क्षेत्रामधील सेल फोनच्या टॉवरवरून होणारे मोबाईलचे संदेश तपासले जाणार आहेत. त्यामधून मध्य प्रदेशातील सिम कार्डमधून मोबाईलवर संदेशाची देवाणघेवाण झाली आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे.
पोलिसांना सतर्क करा
लोखंडी फास लावून होणाऱ्या वन्यजिवांच्या शिकारीच्या प्रयत्नाबाबत नजीकच्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क करा. शिकारी होणार नाहीत, याची दक्षता घ्या. यादृष्टीने कार्यवाही करून अनुपालन अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिले आहेत.
कटनी ट्रॅप
शिकारीकरिता लोखंडी ट्रॅप मध्य प्रदेशातील कटनी येथे बनवले जातात. लहान-मोठ्या आकारातील हे कटनी ट्रॅप वन व वन्यजीव विभागाकरिता नवीन नाहीत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत यापूर्वी वाघांसह वन्यजिवांच्या शिकारीकरिता ते वापरले गेले आहेत. या अनुषंगाने बहेलिया गॅंगच्या सदस्यांना पकडण्यातही आले होते. परतवाडा वनपरिक्षेत्र अंतर्गत अचलपूर तालुक्यातील खैरी दोनोडा गावानजीक खैरी शिवारात २५ एप्रिल २०२० रोजी लोखंडी ट्रॅप मध्ये बिबट अडकला होता. वन अधिकाऱ्यांनी आरोपींच्या शोधार्थ टाकलेल्या धाडी एकापेक्षा अधिक कटनी ट्रॅप आढळून आले होते.