अमरावती : सद्यास्थितीत जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण सुरू आहे. या लसीकरणामध्ये फ्रंटलाईन वर्करचेसुद्धा लसीकरण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक तालुक्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फ्रंटलाईन वर्करचे लसीकरण प्राधान्याने करावे, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांना दिले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार सध्या जिल्हाभरात आरोग्य विभागाच्या माध्यमातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. यासोबतच शासनाच्या सूचनेनुसार फ्रंटलाईन वर्क़र यांचेसुद्धा लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य विभाग, बँक, एम.एस.ई.बी, परिवहन विभाग, शिक्षक, पत्रकार, पेट्रोल पंप, स्वस्त धान्य दुकानदार या फ्रंटलाईन वर्करचेसुद्धा लसीकरण करण्यात यावे. सदर अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण करताना त्यांचे कार्यालयाचे ओळखपत्र, आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासोबतच त्यांचेही लसीकरण करण्यात यावे, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी १४ तालुक्यांच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.
कोट
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम ग्रामीण भागात राबविली जात आहे. शासनाच्या सूचनेनुसार ४५ वर्षांवरील आणि फ्रंटलाईन वर्करचेही लसीकरण केले जाणार आहे.
डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी