जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न : रस्ता, शिक्षण सोयीची मागणीअमरावती : विविध समस्यासंदर्भात प्रशासन व लोकप्रतिनिधींनी आजवर दखल न केल्यामुळे दर्यापूर तालुक्यातील आंतरगावच्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार असल्याचे जाहीर केले. याविषयीची गंभीर दखल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी घेऊन संवाद साधला. सहायक जिल्हाधिकारी व दर्यापूर तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ग्रामस्थांशी चर्चा झाली. याला गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अमरावती व अकोला जिल्हा सिमेवर असणाऱ्या या गावाला पोहचण्यासाठी डांबरी रस्ता नाही. गावाच्या विकासासाठी १४ व्या वित्त आयोगाचा निधी नाही, गावात सर्वत्र अतिक्रमण व घाणीचे साम्राज्य आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागते. मार्ग नादुरूस्त रस्त्याअभावी बससेवा नाही यासह अन्य मागण्यांची दखल आजवर जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी घेतली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला व प्रचारासाठी कुठल्याच राजकीय पक्षांनी गावात प्रवेश करू नये अशी जाहीर फलक मुख्य मार्गावर लावला. यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गांभिर्याने दखल घेऊन सुदृढ लोकशाही मतदान करणे आवश्यक असल्याची बाब गावकऱ्यांच्या निदर्शनात आणली. तसेच सहायक जिल्हाधिकारी व दर्यापूर तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शनिवारी गावकऱ्यांशी संवाद साधला. याला गावकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आंतरगावचे नागरिक करणार मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2017 12:09 AM