अमरावती : सरकारी नोकरीचे आमिष देऊन बेरोजगारांकडून मोठी रक्कम लाटणाऱ्या आठ जणांच्या टोळक्याला गाडगेनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील मुख्य आरोपी असलेली दिल्लीतील व्यक्ती मेल्याचे पसरविण्यात आले होते. तथापि, १२ दिवस लागोपाठ तांत्रिक शोध घेऊन त्याला हुडकून काढण्यात आले. या टोळक्यात अमरावती, बडनेरा शहरातील प्रत्येकी एकाचा आणि मोर्शी शहरातील दोघांचा समावेश आहे.
पोलीस सूत्रांनुसार, चांदूर बाजार तालुक्यातील हिरूरपूर्णा येथील विलास एकनाथराव भुस्कडे (५०) यांची मुलगी साक्षी हिला आरोग्य सेवा संचालनालय, आयकर विभाग, उत्तर रेल्वे, प्रधान मुख्य आयकर आयुक्त यांच्या कार्यालयाचे अस्सल भासणारे पत्र देऊन नोकरीच्या आमिषाखाली १५ लाखांनी फसवणूक करण्यात आली. याबाबत भुस्कडे यांनी आशुतोष अनिल तायडे (प्रवीणनगर, अमरावती) अनिल तायडे, त्याची मुलगी, दिल्ली व मुंबई येथील इन्कम टॅक्स व जीएसटी कार्यालयात भेटलेली व्यक्ती व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात मुलाखत घेणारी अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त परिमंडळ-१ सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, यांनी कोरोनाकाळात झालेल्या या फसवणूक प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्याचे आदेश सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद साळोखे यांच्या नेतृत्वातील तपास पथकाला दिले होते. पथकाने दोन महिन्याच्या तपासात अमरावती, यवतमाळ, मुंबई, सातारा, दिल्ली येथून एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली. तथापि, मुख्य आरोपी असलेला दिल्ली येथील अनिल उदय गौतम ऊर्फ माथूर (३८, रा. वाणी विहार, उत्तमनगर, दिल्ली) हा मरण पावल्याची वदंता पसरविण्यात आली होती. तथापि, १२ दिवस सलग तांंत्रिक तपास करून त्याला अटक करण्यात आली.
आशुतोष अनिल तायडे (२६, रा. प्रवीणनगर, अमरावती), अनिरुद्ध ऊर्फ चंदन भागवतराव राऊत (३३, रा. मोर्शी), चंद्रशेखर ऊर्फ विशाल धनराज बडोदेकर (३६, रा. मोर्शी), दादाराव जंगलू इंगळे (६९, रा. बडनेरा), राजेंद्र नामदेव पोटेकर (४२, रा. सातारा), विकास कुमार अशोक कुमार (३९, रा. दिल्ली), सुनील यशवंत कदम (३९, रा. मुंबई) अनिल उदय गौतम ऊर्फ माथूर (३८, रा. वाणी विहार, उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सात जण न्यायालयीन कोठडीत तर मुख्य आरोपी अनिल उदय गौतम उर्फ माथुर हा पोलीस कोठडीत आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश देण्यात आले. त्याच्याकडून आणखी किती नागरिकांना सरकारी नोकरी लावण्याचा नावाने फसविण्यात आले, याचा तपास होत आहे. आरोपींकडून पोलिसांनी रोख ७० हजार रुपये, सोन्याचे १२ लाख ४० हजार ९६६ रुपयांचे दागिने, ७०६ ग्रॅम चांदीचे दागिने, शोभेचे १५ हजार ४०० रुपयांचे दागिने, लॅपटॉप, प्रिंटर असा १३ लाख २२ हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद साळोखे, उपनिरीक्षक गिरी, राजेंद्र जठाळे, नंदकुमार इंगळे, अमोल यादव, गोरख पिंगळे, राहुल टवलारकर, मनीराम पेठकर, ओम सावरकर, सिद्धार्थ शृंगारपुरे यांच्या पथकाला तांत्रिक मदत सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, पोलिस अंमलदार पंकज गाडे यांच्यात पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.