अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : ‘आंतरराज्य सागवान तस्करीत सब गोलमाल है’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित करताच गुरुवारी सकाळी ८ पासूनच वन अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. अवघ्या आठ तासांतच आरोपींच्या शोधार्थ मध्य प्रदेशचे वनाधिकारी आपल्या ताफ्यासह परतवाड्यात दाखल झाले आहेत.
मध्य प्रदेश जंगलातील सागवान लाकडाची अवैध कटाई करून तस्करी करणारे वाहन परतवाडा वनपरिक्षेत्रातील वडुरा येथे १९ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास महाराष्ट्र वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.
मध्य प्रदेशातील सावलमेंढा वन परिक्षेत्रांतर्गत २० नोव्हेंबरला या अनुषंगाने वनगुन्हा दाखल केला गेला. यात परतवाड्यातील संशयित आरोपींची नावे त्यांना मिळाली. पण मागील २५ दिवसांत मध्य प्रदेश वन अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वन अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांची साधी चौकशीही केलेली नव्हती.
नोटीस बजावणार
‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित करताच मध्य प्रदेश वनाधिकारी आपल्या ताफ्यासह परतवाडा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल झाले. आरोपींबाबत त्यांनी माहिती घेतली. या आरोपींवर ते आता नोटीस बजावणार आहेत.
मध्य प्रदेश वन विभाग गंभीर नाही
सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना १९ नोव्हेंबरला मध्य प्रदेश वन विभागाचा कर्मचारी अपघातग्रस्त झाला. यात तो मृत्यूच्या दाढेतून परतला; पण याची फारशी दखल मध्य प्रदेश वन विभागाने घेतल्याचे दिसून येत नाही. वन तस्करांच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलेले नाही.
२५ दिवसांत दुसऱ्यांदा तस्करी
मध्य प्रदेश वन क्षेत्रातून सागवान लाकडाची अवैध वृक्षतोड करून महाराष्ट्रात तस्करी होण्याचा अवघ्या २५ दिवसांत दुसरा प्रसंग उजेडात आला आहे; पण ते वाहन त्यांना मिळालेच नाही.