अमरावती : कारागृहात भ्रमणध्वनी वापरास लगाम असला तरी प्रशासनाने बंदीजनांना १५ दिवसांतून एकदा नातेवाईकांशी पाच मिनिटे दूरध्वनीवर संवाद साधण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार येथील मध्यवर्ती कारागृहात गुरूवारी दोन क्वॉईन बॉक्स लावण्यात आले आहे. कारागृह प्रशासन बंद्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसनासाठी कार्यरत आहे. हातून नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित करीत असलेल्या बंदीजनांना पाषाण भिंतीच्याआड काही सुविधा देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने कारागृह प्रशासनाने महिला आणि पुरूष बंदीजनांसाठी स्वतंत्र क्वॉईनबॉक्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १५ दिवसांतून एकदा नातेवाईकांशी संवाद साधण्याची या क्वॉईनबॉक्सद्वारे मुभा राहणार आहे. (प्रतिनिधी)कारागृह प्रशासनाची राहणार करडी नजरक्वॉईनबॉक्सद्वारे नातेवाईकांशी संवाद साधणाऱ्या बंदीजनांचे रेकॉर्ड उपलब्ध राहील. महिन्यातून किती बंदीजनांनी क्वॉईन बॉक्सचा वापर करून नातेवाईकांशी संवाद साधला याचा अहवाल गृह विभागाला पाठवावा लागणार आहे. बंद्यांनी कोणाशी संवाद साधला त्याचे नाव, बंदीजनासोबत असलेली नाती, संवादाचा वेळ अंकित केला जाणार आहे. नातेवाईकांशी संवादाची मुभा मिळाली असली तरी या संवादावर कारागृह प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. पुरुष आणि महिला बराकीत स्वतंत्रपणे लावण्यात आलेल्या क्वॉईनबॉक्स हाताळणे, बंद्यांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दोन्ही क्वॉईनबॉक्सचे उद्घाटन कारागृह अधीक्षक खटावळकर यांच्या हस्ते गुरूवारी पार पडले. बंद्यांसाठी कारागृह प्रशासनाने क्वॉईनबॉक्सची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे काही बंद्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, हे विशेष. (प्रतिनिधी)
बंदीजन पंधरवड्यातून एकदा साधणार नातेवाईकांशी संवाद
By admin | Published: January 29, 2015 10:58 PM