अमरावती: ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेनुसार राज्य शासन व पोलिस महासंचालक कार्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून ग्रामीण पोलिस दलाने ई-ऑफिस कार्यप्रणाली कार्यान्वित केली आहे. दि. १ मेपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमरावती ग्रामीण पोलिस घटकातील पोलिस अधीक्षक कार्यालय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, सर्व शाखा, आठ उपविभागीय कार्यालये, ३१ पोलिस ठाणी तसेच सर्व वरिष्ठ प्रशासकीय कार्यालये ई-ऑफिस कार्यप्रणालीने परस्परांशी जोडली जाणार आहेत.
अमरावती ग्रामीण पोलिस घटकाच्या वरिष्ठ कार्यालयाशी तसेच जिल्हांतर्गत पोलिस ठाणी, विविध शाखा, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांमध्ये होणारे पत्रव्यवहार सोयीस्कर व जलदगतीने होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १ मेपासून अमरावती ग्रामीण पोलिस घटकातील सर्व पोलिस ठाणी, गुन्हे शाखा, विशेष शाखा, वाहतूक शाखा तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय येथील कामकाज ई-ऑफिस कार्यप्रणालीद्वारे हाताळले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
कागदविरहित पत्रव्यवहारकागदविरहित पत्रव्यवहार हा ई-ऑफिस कार्यप्रणालीचा मुख्य उद्देश आहे. या प्रणालीचा वापर केल्याने कामकाजामध्ये गती प्राप्त होऊन कोणत्याही प्रकरणाचा जलदगतीने निकाल लागेल. ई-ऑफिस कार्यप्रणालीद्वारे करण्यात येणारा पत्रव्यवहार हा सुरक्षित व गोपनीय स्वरूपाचा राहणार आहे. संबंधितांची जबाबदारी निश्चित होईल तसेच करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराचे जतन हे महत्त्वाचे काम त्यातून होणार आहे.ई-ऑफिस कार्यप्रणालीने कार्यालयीन कामकाज जलदगतीने, कागदविरहित होईल. त्यामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व नियमितता येणार आहे. १ मेपासूृन त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.-विशाल आनंद, पोलिस अधीक्षक