अमरावती : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी सकाळी ७ ते ८ दरम्यान शालेय विद्यार्थी, युवक, नागरिकांमध्ये योगविषयक प्रचार व प्रसारासाठी जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात मुख्य कार्यक्रम विभागीय क्रीडा संकुल येथून गुगल मिटद्वारे ऑनलाईन होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आर्ट ऑफ लिव्हिंग, वंदे मातरम् योग प्रसारक मंडळ, भारत स्वाभिमान ट्रस्ट, पतंजली योग समिती, जिल्हा आशु-तू-डो आखाडा, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, जिल्ह्यातील विविध योग संघटना, योगाशी निगडित विविध स्वयंमसेवी संस्था, योगप्रेमी यांच्यावतीने होत आहे. प्रात्यक्षिके व मार्गदर्शनाकरिता तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून राजू देशमुख व जयमाला देशमुख यांची नियुक्ती केली आहे. तांत्रिक जबाबदारी संघरक्षक बडगे यांना सोपविण्यात आली आहे. यावेळी ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध योग संघटना व योगासनाशी निगडित सर्व संस्था/मंडळे, शाळा-महाविद्यालये यांनी आपल्या स्तरावरून ऑनलाईन ॲप्सद्वारे गुगल मिट, झूम ॲप व इतर व्हर्च्युअल पद्धतीने योग व प्राणायाम प्रात्यक्षिके व मार्गदर्शनाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तेजराव काळे व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
--------------------------
अंजनगावात स्पर्धा परीक्षा
अंजनगावातील योग निसर्गोपचार महाविद्यालय मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेजद्वारे ऑनलाइन नि:शुल्क स्पर्धा परीक्षा होत आहे. २१ जून रोजी सायंकाळी ५ वाजता ती आयोजित करण्यात आली आहे. यासाठी वयाची मर्यादा नाही, अशी माहिती प्राचार्य नंदकिशोर पाटील यांनी दिली.