लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १२ व १३ नोव्हेंबर रोजीच्या हिंसक घटनांच्या अनुषंगाने १३ ते १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंद करण्यात आले होते. मात्र, शहरातील परिस्थिती पाहता, आता ती सेवा १९ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव, गृहविभागाकडे तसा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार, १९ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंत शहर पोलीस आयुक्तालयातील टू-जी, थ्री-जी, फोर-जी, सीडीएमए, जीपीआरएस, मेसेज सर्व्हिसेस, डोंगल सर्व्हिसेस, केबल इंटरनेट, वायरलाईन इंटरनेट, फायबर इंटरनेट, ब्राॅडबॅन्ड सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांचा तो आदेश सर्व स्थानिक इंटरनेट सर्व्हिस, मुख्य इंटरनेट सर्व्हिस यांना पाठविण्यात आला.
१६ ते १९ नोव्हेंबरच्या दुपारी ३ या कालावधीत शहर आयुक्तालय क्षेत्रात इंटरनेट सेवा चालू करण्यात आली, तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे शहर पोलिसांच्या विशेष शाखेने ऑनलाईन कळविले. मंगळवारी रात्री ७.१४ वाजता हे पत्र फ्लॅश करण्यात आल्याची नोंद विशेष शाखेने घेतली. मात्र, माध्यमांचे इंटरनेट बंद असल्याने ते वृत्त प्रकाशित करण्यास मर्यादा आल्या.
पहिल्या आदेशानुसार, १३ ते १६ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला. तर १६ रोजी पुन्हा ३ वाजतापासून १९ दुपारपर्यंत ती बंदी वाढविण्यात आली. या संपूर्ण घटनाक्रमामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांची पार मुस्कटदाबी झाली आहे.
या बंदीतून माध्यमांच्या कार्यालयांना वगळण्यात यावे, अशी विनंती केली असता, पत्रकारांना शहराबाहेर १५ किमीवर जाण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाने जनहितार्थ जारी केलेले प्रसिद्धी पत्रकही इंटरनेटअभावी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचू शकले नाही.
बॅंकाचे काम नियमित शहरातील नागरिकांच्या आर्थिक व्यवहाराबाबतच्या अडीअडचणी लक्षात घेऊन बॅंकेचे व्यवहार सुरळित राहावे, याकरिता १७ नोव्हेंबरपासून सर्व बॅंका नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात बँकांना संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. याबाबतची प्रेसनोट १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.१७ वाजता जाहीर करण्यात आली, असे विशेष शाखेने म्हटले आहे. ती प्रेसनोट शहर आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात आली. मात्र, इंटरनेट बंद असल्याने ती बॅंक व्यवस्थापन, प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे बुधवारी बहुतांश बॅंकातील कामकाज पूर्णपणे बंद होते.
अनेकांनी धरली शहराबाहेरची वाटकायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात संचारबंदीसह इंटरनेट बंदी लागू केली. त्यामुळे ऑनलाईन आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी आता अनेकांनी मोबाईलची रेंज मिळविण्यासाठी शहराबाहेरील इंटरनेट कनेक्टिव्हीची रेंज असलेल्या रस्त्यांची वाट धरली असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहावायास मिळत आहे. यामध्ये ऑनलाईन कामे करीत असलेले नागरिक तसेच ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच अन्य मोबाईलधारकांचा समावेश आहे.
ज्या ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळत आहे, त्याच ठिकाणी बस्तान मांडले असल्याचे चित्र शहरातून बाहेरगावाला जाणाऱ्या अनेक प्रमुख मार्गावर दिसून आले. आठवड्यात शनिवारपासून इंटरनेट बंदी सुरू आहे. त्यामुळे मोबाईलमधून केवळ संवाद साधता येतो. सोशल मीडिया पूर्णत: बंद आहे. एवढेच नव्हे तर मोबाईलद्वारे आर्थिक व्यवहार बंद पडले आहेत. इंटनेटची रेंज मिळविण्यासाठी शहराच्या सीमेवर जाऊन अनेक जण आपली ऑनलाईन कामे करून घेत आहेत. यात काहींना यश येत आहे.