एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. यातील एक आरोपी फरार आहे.
हरियाणा राज्यातून साजिद खुर्शीद (२८) व निसार अख्तर हुसेन यांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी तिवसा पोलीस ठाण्यात फिर्यादी स्मिता पंजाबराव जोल्हे यांनी तक्रार नोंंदविली होती. त्या मोझरी येथे एचडीएफसीच्या एटीएममध्ये २८ नोव्हेंबर २०२० रोजी पैसे काढण्याकरिता गेल्या असता, अज्ञाताने त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून त्यांच्या खात्यातून देवरणकरनगर (अमरावती) येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून ३७ हजार काढून काढले. याचा तपास गुन्हे शाखेने केला.
सीसीटीव्ही फुटेज, सीडीआरवरून आरोपी हरियाणा राज्यातील गुडगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तपास गतिमान करून २० फेब्रुवारी रोजी आरोपींना हरियाणातून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक हरीबालाजी एन., अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगेे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सहायक निरीक्षक आनंद पिदुरकर व सायबर सेलच्या मदतीने करण्यात आली.
आरोपींकडून १३ एटीएम कार्ड जप्तसदर आरोपींनी राज्यातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, जालना, शिर्डी , अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार मार्गाने प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी गुन्हे केल्याचे पुढे आले. पोलीस कोठडीत ते उघड होऊ शकतात, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे एकूण १३ कार्ड जप्त करण्यात आले.
"कार्डची अदलाबदली करून आरोपी नागरिकांना गंडवायचे. त्यांना हरियाणा राज्यातून शनिवारी पथकाने ताब्यात घेतले. सोमवारी त्यांना न्यायालयासमोेर हजर करण्यात येणार आहे. सदर आरोपींनी अनेक ठिकाणी गुन्हे केले असावे अशी शक्यता आहे"- तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा (अमरावती ग्रामीण)