मेळघाटातील ३५० शिक्षकांचे उपोषण : शिक्षक मागण्यांवर ठामअमरावती : मेळघाटात १५ वर्षे सेवा बजावणाऱ्या ३५० शिक्षकांना कार्यमुक्त न केल्यामुळे त्यांनी सहा दिवसांपासून उपोषण आरंभले आहे. शनिवारी आ. बच्चू कडू यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा केली व शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांशी संवाद साधला. तासाभरात संपूर्ण माहिती जाणून घेतो, असे सचिवांनी सांगितले.३० सप्टेंबरच्या शाळा पटसंख्या निर्धारण तारखेपर्यंत ज्या शाळेत शिक्षक संख्या कमी आहे तेथे शिक्षकांच्या नियुक्ती मंगळवारपर्यंत करण्यात येतील. तसेच ३० टक्के बदल्या ह्या सपाट भागातून दुर्गम भागात करण्यात याव्यात, या न्यायालयाच्या निर्देशान्वये रिक्त जागा भरण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी यांनी चर्चेदरम्यान दिली. दरम्यान उपोषणकर्ते ३५० शिक्षक तत्काळ कार्यमुक्त करावे, या मागणीवर ठाम आहेत. उपोषणाचा सहावा दिवस असून आ. बच्चू कडूंच्या शिक्षण सचिवांशी झालेल्या संवादानंतर सचिव काय निर्णय घेतात याकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे. मेळघाटातील हे शिक्षक सहा दिवसांपासून अमरावती येथे उपोषणावर आहेत. त्यामुळे शाळा बंद पडल्या व विद्यार्थी वाऱ्यावर आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या त्वरित नियुक्त्या कराव्या या मागणीसाठी मेळघाटातील जि. प. सदस्य श्रीपाद पाल यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन केले. या आंदोलनाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. (प्रतिनिधी)
बच्चू कडूंनी साधला शिक्षण सचिवांशी संवाद
By admin | Published: October 02, 2016 12:12 AM