अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नवव्या कुलगुरूपदासाठी ‘शॉर्ट लिस्ट’नुसार अंतिम पात्र पाच उमेदवारांच्या मुलाखती २० जानेवारी रोजी राजभवनात घेण्यात आल्या. मात्र, आता नव्या कुलगुरूंच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे. गत दीड वर्षापासून अमरावती विद्यापीठाचा कारभार प्रभारी सुरू आहे.
अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी डॉ. मिलिंद बाराहाते (नागपूर), डॉ. रामचंद्र मंठाळकर (नांदेड), डॉ. ए. एम. महाजन (जळगाव), डॉ. वाणी लातूरकर (नांदेड) आणि डॉ. राजेश गच्चे (पुणे) या पाच उमेदवारांच्या मुलाखती आटोपल्या आहेत. शासनाद्वारे गठित कुलगुरू निवड समितीकडून मुंबईच्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ११ व १२ जानेवारी रोजी ४३ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या यानंतर शॉर्ट लिस्टनुसार अंतिम पाच नावे कुलगुरूपदाच्या नियुक्तीसाठी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. तथापि, अमरावतीचे नवीन कुलगुरू कोण, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. अमरावती, नांदेड अन् छ. संभाजीनगरही वेटिंगवर
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर या तीनही विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती वेटिंगवर आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे निवड समितीने अंतिम यादी पाठविल्याची माहिती आहे. अमरावतीत डॉ. मिलिंद बाराहाते, तर छ. संभाजीनगर येथे डॉ. राजेश काकडे यांची कुलगुरूपदांसाठी नावे निश्चित झाले असून, केवळ नावांच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याची विश्वसनीय माहिती आहे. नांदेड येथील कुलगुरूपदासाठी मुलाखती २९ व ३० जानेवारीलास्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील कुलगुरूपदासाठी २९ व ३० जानेवारी २०२४ राेजी निवड समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. त्यानंतर अंतिम पाच उमेदवारांची नावे ही समिती राज्यपालांकडे पाठविणार असून, येत्या फेब्रुवारी महिन्यात नांदेड विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळतील, असे संकेत आहेत.