वरूड : तालुक्यातील पेठ मांगरुळी ग्राम पंचायतीत स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सरपंचांनी ध्वजारोहण केले. मात्र, ध्वज उलटा फडकविण्यात आला. यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे. वृत्त लिहिस्तोवर याबाबत तक्रार झालेली नव्हती. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. यामुळे या घटनेबाबत कारवाही कुणावर होणार, याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.
प्राप्त माहिती नुसार , तालुक्यातील पेठ मांगरूळी ग्रामपंचायतमध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला . यावेळी सरपंचाचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . परंतु ध्वज उलटा असल्याने उपस्थितांमध्ये खळबळ माजली . ध्वज उलटा फडकविल्याने राष्ट्रध्वजाचा अपमान झाला.पुन्हा ध्वज खाली उतरवून सरळ करण्यात आला . मात्र याबाबत ग्रामस्थामध्ये चर्चेला पेव फुटले होते . तर याबाबत तक्रार देण्याकरिता काहींनी पुढाकार घेतला असता तहसील कार्यालयाला सुटी असल्याचे कारण पुढे आले .
बीडीओंनी दिला दुजोरा
गटविकास अधिकारी वासुदेव कणाटे यांना विचारणा केली असता झालेला प्रकार सत्य असून, याबाबत तहसीलदारांना तक्रार करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, ऐनवेळी जाणारे अधिकारी एखाद्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडे राष्ट्रध्वजाचा काम सोपवून निघून जात असेल तर ही बाबा अक्षम्य आहे. याबाबत प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक असल्याचा सूर ग्रामस्थांमधून उमटत आहे.