परतवाडा : हरिसाल परिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली. तसे पत्रसुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनक्षेत्रात कार्यरत दीपाली चव्हाण या २८ वर्षीय तरुण अधिकाऱ्याने शासकीय निवासस्थानात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात सेवा बजावत आणि आपल्या कामाची छाप सोडणाऱ्या दीपाली चव्हाण या गर्भवती असताना त्यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानसिक व शारीरिक छळ करून त्यांची मुस्कटदाबी केली. त्यांनी कच्या रस्त्यावरून पायी फिरण्याची, सुट्टी न देण्याची, वेतन रोखून धरण्याची शिक्षा दिली होती. एका गर्भवती महिला अधिकाऱ्याचा अशाप्रकारे छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करणारी ही घटना महाराष्ट्र राज्याच्या वनखात्याला आणि एकूणच प्रशासकीय व्यवस्थेला काळिमा फासणारी असल्याचे पत्रात नमूद आहे.
दिपाली चव्हाण यांची हत्या झाली असल्याचाही संशय या प्रकरणात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल शासनाने घेण्याची आवश्यकता आहे. संबंधित उपवनसंरक्षक यांना अटक करण्यात आली असली तरी संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रसंचालक व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणात प्राथमिकदृष्ट्या दोषी आढळून येणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने कारवाई झाली नाही तर प्रकरणातील महत्त्वाचे साक्षी, पुरावे नष्ट केली जाण्याची दाट शक्यता असल्याचे दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बॉक्स
या आहेत दरेकर यांच्या मागण्या
अटक केलेल्या उपवनसंरक्षकाला तातडीने सेवेतून निलंबित करावे, संबंधित क्षेत्र संचालक व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनाही अटक करून त्यांना निलंबित करावे. या प्रकरणात आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून तातडीने गुन्ह्याचा तपास करावा, अशी मागणी पत्राद्वारे शासनाकडे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.